अकोला - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाळेमुळे असलेल्या अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणाचा तपास ंमंगळवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) कडे देण्यात आला. सीआयडीच्या पोलीस अधीक्षकांनी खदान पोलीस स्टेशनमधून रात्री उशिरा या प्रकरणाचे दस्तावेज ताब्यात घेतले; मात्र स्थानिक गुन्हे शाखेकडे असलेला तपास त्यांच्याकडेच ठेवण्यात आल्याची माहिती आहे. किडनी तस्करी प्रकरणामध्ये शांता रामदास खरात, देवानंद कोमलकर, अमर शिरसाट यांची किडनी खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्यात आला आहे. त्यांना कर्जाची रक्कम परत न देता आणखी पैसे देण्यासोबतच विविध प्रकारचे आमीष दाखवून त्यांची किडनी औरंगाबाद येथील हॉस्पिटलमध्ये काढण्यात आली. खदानचे ठाणेदार छगन इंगळे यांनी या प्रकरणातील आरोपी विजय पवार, देवेंद्र शिरसाट, तायडे, प्रमोद शेजव यांना अटक केली. या प्रकरणातील डॉक्टरांवर कारवाईचा फास आवळल्या जात असतानाच तसेच खदान पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात असतानाच तपास मंगळवारी रात्री राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. राज्य गुन्हे अन्वेषण अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक पठारे यांनी रात्री उशिरा खदान पोलिसांकडून सर्व दस्तावेज ताब्यात घेतले असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
किडनी तस्करीचा तपास ‘सीआयडी’कडे
By admin | Published: March 02, 2016 2:49 AM