देवानंद आग्रे
रोहनखेड : खापरवाडी-अकोट-कायवाडी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकास अंदाज येत नसल्याने गाडी घसरून अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
खापरवाडी-कायवाडी हा परिसरातील नागरिकांचा महत्त्वाचा रस्ता असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असल्याने वाहनचालकास वाहन चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. खापरवाडी-कायवाडी रस्त्याचे अंतर पाच कि.मी. असून, खड्ड्यांमुळे वाहनचालकास अकोटला जाण्यासाठी अर्धा तास लागतो. खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह परिसरातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. (फोटो)
--------------------------
खड्ड्यांची थातुरमातुर डागडुजी
सार्वजनिक बांधकाम विभागाने खापरवाडी-कायवाडी रस्त्यावरील खड्ड्यांची थातुरमातुर डागडुजी केली होती; मात्र काही दिवसांतच पुन्हा खड्डे पडल्याने रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप होत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
-------------------------
या गावांसाठी महत्त्वाचा रस्ता!
खापरवाडी-अकोट या मार्गावर रोहनखेड, वरुड जऊळका, बांबर्डा, दिनोडा, कायवाडी, लहान खापरवाडी, आदी गावांच्या नागरिकांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता जिल्ह्याच्या मुख्यालयाशी जोडतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते.
----------------------------
खड्ड्यात साचते पाणी!
खापरवाडी-अकोट मार्गावर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी पत्र देऊ.
धीरज सिरसाट, पं. स. सदस्य, अकोट.
----------------
कायवाडी ते खापरवाडी या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची गरज आहे.
-रणजित रमेश झामरे, माजी सरपंच रोहनखेड.