दिग्रस बु. येथे नालेसफाईच्या कामांना वेग
दिग्रस बु. : पातूर तालुक्यातील दिग्रस येथे नाल्यामधील घाण, कचरा वाढल्याने नाल्या तुंबून घाण पसरली होती. ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आल्याने तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामांना सुरुवात केली आहे.
पीकविमा योजनेला शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद!
मूर्तिजापूर : गतवर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अति पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तरीही काही शेतकऱ्यांना अद्यापही पीकविम्याची मदत मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेकडे पाठ फिरविल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
पिंजर परिसरात व्हायरल फिव्हरची साथ!
निहिदा : वातावरणात झालेल्या बदलामुळे पिंजर परिसरात व्हायरल फिव्हरची साथ पसरल्याचे चित्र आहे. परिसरातील गावांत ताप, सर्दी, खोकला, हात-पाय दुखणे आदी आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.
दहीहांडा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घाणीचे साम्राज्य
दहीहांडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रुग्णांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. आवारात व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानी असलेल्या पटांगणात पावसाच्या पाण्याची मोठमोठी डबकी साचलेली आहेत.
बेलुरा येथील वृक्षलागवड कामाची पाहणी
अकोट : तालुक्यातील बेलुरा येथे रोहयोचे अमरावती विभागीय उपआयुक्त तपासणी अधिकारी गव्हाळे व चौधरी यांनी ग्रामपंचायत बेलुरा येथील वृक्षलागवड कामाची पाहणी केली. तपासणीदरम्यान त्यांना कामाबाबतच्या नोंदी रोजगार सेवक गौतम पाचांग यांनी दाखवल्या. तसेच सचिव बिरकड यांनी माहिती दिली.
सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त
दहीहांडा : दहीहांडा अकोला तालुक्यातील मोठे गाव असून, या गावाची लोकसंख्या अंदाजे १४ हजारांच्या जवळपास आहे. काही दिवसांपासून गावात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या, परंतु अद्यापपर्यंत तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.
रस्त्यावरील धुळीने वाहनचालक त्रस्त
गायगाव : अकोला-शेगाव वारी मार्गाचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, रस्त्यावर कंत्राटदाराने एका बाजूने गिट्टी टाकून ठेवली आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर धुळीचे लोट उडत आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जि.प. शाळेची इमारत धोकादायक!
वाडी अदमपूर : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामवाडी अदमपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक झाली असून, विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. धोकादायक इमारतीमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.
रोहनखेड येथे पाणीटंचाई, ग्रामस्थ त्रस्त
रोहनखेड : गत दहा-बारा दिवसांपासून ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. कुठे नळांना पाणी येते, तर काही भागांत नागरिकांना पाण्यासाठी जागरण करावे लागत आहे. जागरण करूनही पाणी मिळत नाही. दलित वस्ती भागातील नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
दानापूर ग्रामीण पत्रकार संघटनेची कार्यकारिणी
दानापूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ तेल्हारा तालुका तथा हिवरखेड शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. दानापूर शाखा अध्यक्षपदी प्रमोद हागे, उपाध्यक्षपदी नंदकिशोर नागपुरे, संघटकपदी गोपाल वाकोडे, सचिवपदी प्रेमकुमार गोयंका, कोषाध्यक्षपदी रवींद्र ढाकरे, तर कार्याध्यक्षपदी रवी वाकोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आरोग्य केंद्रात नियोजनाचा अभाव
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार रोजी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण बाबतीत नंबर, अतिरिक्त गर्दी आदी नियोजनाचा अभाव असल्याने रुग्णांकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
कवठा येथे रेशनकार्डधारकांची चौकशी
कवठा : काही दिवसांपूर्वी कवठा येथील रेशन कार्डधारकांनी स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार गावातील रेशनकार्डधारकांनी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी जबाब नोंदविले.
वनमजुरावर उपासमारीची पाळी!
बार्शिटाकळी : २०२० मधील एप्रिल, मे व जून तसेच २०२१ मार्चपासून पगार न मिळाल्याने बार्शिटाकळी तालुक्यातील चिंचोली येथील वनमजूर सुनील सोपान खंडारे यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. थकीत वेतन मिळण्यासाठी खंडारे यांनी विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांच्याकडे २ जुलै रोजी रीतसर अर्ज करून मागणी केली आहे.
कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन रखडले!
बाेरगाव मंजू : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या मध्यवर्ती प्रात्यक्षिके प्रक्षेत्र वणी रंभापूर येथील अस्थाई मजुरांचे गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वेतन रखडले. वेतन प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमदार अमोल मिटकरी, आमदार नितीन देशमुख यांना कामगार कृती समितीने निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.
अडगाव खु. येथील जि.प. शाळेच्या खोल्या धोकादायक
अडगाव खु. : येथील एक ते सात वर्ग असलेली जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारतीचे बांधकाम स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. शाळेच्या सात वर्गखोल्यांपैकी चार वर्गखोल्या धोकादायक झाल्या असून, त्या कधीही कोसळू शकतात. शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालूनच शिक्षण घ्यावे लागेल.