रोहनखेड : अकोट तालुक्यातील कुटासा - रोहनखेड पाच किमी. अंतराच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे
रोहनखेड येथील नागरिकांसाठी हा मार्ग प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. येथील ग्रामस्थांना बाजारपेठ, रुग्णालये, शिक्षण आदींसाठी कुटासा येथे जावे लागते. त्यामुळे रात्रीच्या सुमारास ही या मार्गावर वाहतूक राहते. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही दररोज याच रस्त्याने प्रवास करावा लागतो. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
------------------------
रोहनखेड - कुटासा रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. या रस्त्याने वाहन तर सोडाच पायी सुद्धा चालता येत नाही. रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
-अनिता अशोक चव्हाण, सरपंच, रोहनखेड.
---------------
कुटासा येथील शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे रोहनखेड येथील विद्यार्थी कुटासा येथील विद्यालयात दररोज ये-जा करतात. रस्त्यावर खड्डेच खड्डे असल्याने अपघाताची भीती आहे. रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
-मनीष अरविंद वानखडे, विद्यार्थी, रोहनखेड.