अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नऊ आरोपींपैकी तीन मुख्य आरोपींनी मंगळवारी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर या तीनही आरोपींना बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने आरोपींना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. यामध्ये भाजयुमोचा प्रदेश उपाध्यक्ष छोटू ऊर्फ विक्रम गावंडे, त्याचे वडील श्रीराम गावंडे आणि चुलत भाऊ धीरज गावंडे या तिघांचा समावेश आहे.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे रा. खेतान नगर, कौलखेड आणि सतीश तायडे, विशाल तायडे व साबीर रा. बार्शीटाकळी या नऊ जणांसह त्यांच्या चार साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची टेबल, खुर्ची डोक्यावर आदळून तसेच अग्निरोधक सिलिंडरने त्यांच्या डोक्यावर हल्ला करून हत्या केली होती. या प्रकरणाची तक्रार प्रवीण हुंडीवाले यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या नऊ जणांसह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खुनाचा व दंगलीचा गुन्हा दाखल करून मंगळवारी सकाळी विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे आणि श्रीराम कसदन गावंडे या तीन आरोपींना अटक केली. त्यांना बुधवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर फरार असलेल्या सहा आरोपींचा शोध पाच पथकांकडून घेण्यात येत आहे.साथीदारांची चौकशीप्रविण हुंडीवाले यांनी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात ९ आरोपींची नावे दिली तर त्यांच्यासोबत आणखी चार जन असल्याचे नमुद केले. त्यामूळे पोलिस अधीक्षकांनी या अज्ञात चार जनांपैकी तिघांची चौकशी केली असून त्यामध्ये गावंडे यांच्या कुटुंबातील आणखी दोघांचा समावेश असून एक ठाकूर नामक युवक असल्याची माहिती आहे.
किसनराव हुंडीवाले हत्याकांड; तीनही आरोपीना १६ मे पर्यंत पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 6:04 PM