अकोला: महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करणाऱ्या नऊ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, या प्रकरणातील फरार असलेल्या चार आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. अटकेतील आरोपींना १६ मेपर्यंत पोलीस कोठडी असून, या प्रकरणात कौलखेडमधील आणखी दोन युवकांवर पोलिसांचा संशय आहे.स्वामी विवेकानंद राष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, कौलखेड या शैक्षणिक संस्थेतील सभासदांच्या निवड प्रक्रियेचा वाद २०१४ पासून सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सुरू आहे. याच वादाच्या प्रकरणात सोमवार, ६ मे रोजी दुपारी १२ वाजता किसनराव हुंडीवाले न्यास नोंदणी कार्यालयात त्यांचा मुलगा प्रवीण यांच्यासोबत उपस्थित असताना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल सुखदेव तायडे, मयूर गणेशलाल अहीरे, दिनेश ठाकूर, प्रतीक दत्तात्रय तोंडे व साबीर यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात येऊन किसनराव हुंडीवाले यांची हत्या केली होती. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली तर सतीश तायडे, विशाल तायडे, मयूर अहीर, दिनेश ठाकूर, प्रतीक तोंडे या पाच आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. हुंडीवाले हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली असून, त्यांना १६ मेपर्यंत पोलीस कोठडी आहे. चार आरोपी अद्यापही फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.