अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना केवळ ३५८ कोटी रुपये (२६ टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यातील पीक कर्जाचे वाटप अत्यल्प असल्याच्या मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मंगळवारी पीक बँकांच्या कामगिरीवर चांगलेच ताशेरे ओढले. येत्या १५ आॅगस्टपर्यंत ५० टक्के पीक कर्जाचे वाटप करण्याचा ‘अल्टीमेटम’देखील त्यांनी बँकांना दिला.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेणिया, निवासी उपजिल्हाधिकारी राम लठाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते. यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आणि त्या तुलनेत आतापर्यंत करण्यात आलेले पीक कर्जाचे वाटप, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाचे वाटप यासंदर्भात बँकनिहाय कामाचा आढावा किशोर तिवारी यांनी घेतला. जिल्ह्यात १ हजार ३९८ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत आतापर्यंत केवळ ३५८ कोटी रुपये (२६ टक्के) पीक कर्ज वाटप करण्यात आल्याने, पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट कमी घेऊनही पूर्ण होत नसल्याच्या मुद्यावर किशोर तिवारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्दिष्टाच्या जिल्ह्यात शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अत्यल्प असल्याने, कर्ज वाटपातील बँकांच्या कामगिरीवर तिवारी यांनी चांगलेच ताशेरे ओढले. येत्या १५ आॅगस्टपर्यंत किमान ५० टक्के पीक कर्ज वाटपाचे काम पूर्ण करण्याचा अल्टीमेटमही किशोर तिवारी यांनी जिल्ह्यातील बँकांना दिला. या आढावा बैठकीला राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.बँका शेतकºयांना कर्ज नाकारत असल्याने सावकारीला पुरुज्जीवन!बँका शेतकºयांना कर्ज नाकारत असल्याने, ग्रामीण भागात मायक्रो फायनान्स कंपन्यांचा धंदा वाढला असून, त्याद्वारे सावकारीला पुरुज्जीवन मिळत आहे. मायक्रो फायनान्स कंपन्या बँकांकडून ६ टक्के व्याज दराने पैसे घेतात आणि शेतकरी, शेतमजूर व बचत गटांना २२ ते २४ टक्के व्याजदराने कर्ज वाटप करतात. त्यामुळे बँकांनी शेतकºयांना तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, अशा सूचना किशोर तिवारी यांनी दिल्या.कर्ज नाकारल्याने शेतकरी आत्महत्या झाल्यास फौजदारी!कर्जासाठी पात्र असताना बँकेने कर्ज नाकारल्याने, एखाद्या शेतकºयाने आत्महत्या केल्याचे आढळून आल्यास संबंधित बँकेवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा किशोर तिवारी यांनी या बैठकीत दिला.कर्जासाठी शेतकºयांचा छळ करू नका!कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांना नवीन पीक कर्ज तातडीने वाटप करण्याचे सांगत, कर्जासाठी शेतकºयांचा छळ करू नका, असे निर्देश किशोर तिवारी यांनी बँकांना दिले. पात्र शेतकºयांना कर्ज नाकारू नका, असेही त्यांनी सांगितले.प्रलंबित प्रकरणांचा अहवाल सादर करा!पीक कर्ज वाटपासंदर्भात तालुका स्तरावर समित्या गठित करण्यात आल्या असून, त्याद्वारे किती प्रकरणे निकाली काढण्यात आली. यासंदर्भात विचारणा करीत, शेतकºयांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणांचा अहवाल प्रत्येक आठवड्यात जिल्हा उपनिबंधक व जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांकडे सादर करण्याच्या सूचना किशोर तिवारी यांनी बँकांना दिल्या.