अकोला: शहरातील व्यापारी किशोर खत्री हत्याकांड प्रकरणात गुरुवारी दुपारी न्यायालयात सरकारी पक्षाने दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यावेळी प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती.व्यापारी किशोर खत्री यांची आर्थिक वादातून रणजितसिंह चुंगडे, रुपेशसिंह चंदेल, जसवंतसिंह चौहान ऊर्फ जस्सी आणि राजू मेहरे यांनी ३ नोव्हेंबर २०१५ रोजी सोमठाणा शेतशिवारात गोळी झाडून व धारदार कत्त्याने वार करून निर्घृण हत्या केली होती. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खत्री हत्याकांड प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू झाली असून, या प्रकरणात सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रसिद्ध विशेष सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांना नियुक्त करण्यात आले आहे. गुरुवारी पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात हजर झाले. न्यायालयात दोन साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. खटल्यावर पुढील सुनावणी लवकरच होईल. (प्रतिनिधी)