किस्सा खुर्ची का : लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत गाजला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, बियाणी यांनी राजीनामा देत काँग्रेसलाच दिले होते आव्हान

By नितिन गव्हाळे | Published: April 10, 2024 07:14 PM2024-04-10T19:14:48+5:302024-04-10T19:15:53+5:30

काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांनी काँग्रेससह पदांचा राजीनामा देत, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मो. मोहिब्बुल हक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करीत, काँग्रेसलाच आव्हान देत, १९६२ लोकसभा निवडणुकीतच स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. 

Kissa Khurchi ka: The issue of a separate Vidarbha was discussed in the third Lok Sabha election, Biyani resigned and challenged the Congress itself | किस्सा खुर्ची का : लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत गाजला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, बियाणी यांनी राजीनामा देत काँग्रेसलाच दिले होते आव्हान

किस्सा खुर्ची का : लोकसभेच्या तिसऱ्या निवडणुकीत गाजला वेगळ्या विदर्भाचा मुद्दा, बियाणी यांनी राजीनामा देत काँग्रेसलाच दिले होते आव्हान

नितीन गव्हाळे -

अकोला : मार्च १९६२ मध्ये दुसरी लोकसभा विसर्जित करून तिसऱ्या लोकसभेसाठी निवडणूक घेण्यात आली. विदर्भ प्रांत संयुक्त महाराष्ट्रात सामील झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्या काळात स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन जोरात होते. काँग्रेसचे प्रमुख नेते विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी यांनी काँग्रेससह पदांचा राजीनामा देत, स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यांवर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार मो. मोहिब्बुल हक यांच्याविरुद्ध अपक्ष उमेदवारी दाखल करीत, काँग्रेसलाच आव्हान देत, १९६२ लोकसभा निवडणुकीतच स्वपक्षालाच कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली होती. 

एक व्यक्ती, एक पद या मुद्द्यावर आबासाहेब खेडकर यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागेवर काँग्रेसने अकोल्यातून मो.मोहिब्बुल हक आणि खामगाव लोकसभा मतदारसंघातून लक्ष्मण भटकर यांना रिंगणात उतरविले होते. त्यांच्याविरुद्ध ब्रिजलाल बियाणी दंड थोपटले. आंदोलनही तीव्र झाल्याने, विदर्भाच्या प्रश्नावर जनमत खवळले होते. त्यामुळे तत्कालिन पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांना विदर्भात प्रचारासाठी यावे लागले. 

लोकसभा निवडणुकीत ६७.४३ टक्के मतदान झाले. पंडित नेहरू यांच्या सभेमुळे काँग्रेसला बळ मिळाले. उमेदवार मो.मोहिब्बुल हक हे १ लाख ३५ हजार मते घेऊन विजयी झाले. स्वतंत्र विदर्भासाठी काँग्रेसविरोधात भूमिका घेणारे ब्रिजलाल बियाणी यांनी पं.नेहरूंची सभा झाल्यानंतरही तब्बल ८८ हजारांवर मते घेतली होती. रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार शंकरलाल खंडारे यांनी ६२ हजारांवर मते घेत, तिसरा क्रमांक मिळविला. 

ब्रिजलाल बियाणी यांना मतदारांनी ३०.८४ टक्के मतदान करीत, स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला जनाधार असल्याचे दाखवून दिले होते, अशी माहिती प्रा.डॉ.विनोद खैरे यांच्या अकोला लोकसभा मतदारसंघातील राजकारण या पुस्तकामध्ये मांडलेली आहे.

ब्रिजलालजींच्या भूमिकेमुळे पं.नेहरू विदर्भात -
ब्रिजलाल बियाणी हे विदर्भातील काँग्रेसचे मातब्बर नेते होते. १९५२, १९५७ या विधानसभा दोन निवडणुकांमध्ये अकोला व मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार होते. दरम्यान, स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे येत होती. त्यात ब्रिजलालजी अग्रेसर होते, परंतु काँग्रेसचा स्वतंत्र विदर्भाला विरोध असल्याने, त्यांनी स्वपक्षांविरुद्धच बंड केले, जनमत त्यांच्या पाठीशी असल्याने, तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच प्रचारासाठी विदर्भात उतरावे लागले होते.

आता विदर्भाचा मुद्दा गायब
लोकसभा निवडणुका दृष्टीसमोर ठेवून भाजपने स्वतंत्र्य विदर्भाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली आणि वैदर्भीय जनतेने सर्वाधिक जागा भाजपच्या पारड्यात टाकल्या. मात्र, त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीचा मुद्द्याला बगल दिली. त्यानंतर, लोकसभेच्या चार निवडणुका झाल्या, पण विदर्भाचा मुद्दा कुठेच दिसला नाही. आता तर स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दाच गायब झालेला आहे.
 

Web Title: Kissa Khurchi ka: The issue of a separate Vidarbha was discussed in the third Lok Sabha election, Biyani resigned and challenged the Congress itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.