खेट्री (पातूर, जि. अकोला): भूजल पातळीत वाढ व्हावी, तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पातूर तालुक्यातील खेट्री येथील विश्वामित्री नदीवर उभारण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधार्याचे काम गत सहा वर्षांपासून रखडलेले आहे. आतापर्यंत या बंधार्यावर २८ लाख रुपये खर्च करण्यात आल्यानंतरही हे काम पूर्णत्वास न गेल्यामुळे आजरोजी हा सर्व खर्च पाण्यात गेल्याची भावना परिसरातील लोकांकडून व्यक्त होत आहे. पातूर तालुक्यातील खेट्री येथे विश्वामित्री नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यासाठी १९९५ मध्ये पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी या बंधार्यासाठी ९ लाख ९६ हजार रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर झाले; परंतु त्यावेळी बंधार्याचे काम सुरू होऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात महागाई वाढत गेल्याने बांधकामाचा खर्चही वाढला व बंधार्याचे काम सुरूच करण्यात आले नाही. त्यामुळे २७ डिसेंबर २00६ रोजी बंधार्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यावेळी बंधार्यासाठी ३३ लाख ४९ हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यानंतर कामास सुरुवात होऊन जून २00९ अखेरपर्यंत बंधार्याच्या कामावर २७ लाख ९६ हजार रुपये खर्च करण्यात आले. एकूण मंजूर निधीपैकी ८0 टक्के निधी खर्च झाल्यानंतरही बंधार्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने शासनाकडून पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेवर कोट्यवधी खर्च केले जात असताना, पातूर तालुक्यात मात्र शासनाचा हा निधी वाया गेल्याचे चित्र आहे.
कोल्हापुरी बंधारा सहा वर्षांपासून रखडलेला
By admin | Published: January 22, 2015 1:53 AM