लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाकडून कोल्हापुरी बंधार्याच्या कामांत झालेला भ्रष्टाचार प्रसिद्ध असतानाच आता चक्क बंधाराच गायब करण्याचा चमत्कार झाल्याचे पुढे येत आहे. ही बाब खेट्रीच्या सरपंचाने दिलेल्या पत्रातून उघड झाली आहे. गावात दोनपैकी एकच अस्तित्वात आहे. दुसरा बंधारा कोठे आहे, तो शोधून देण्याची मागणी सरपंच अनिता पजई यांनी केल्याने लघुसिंचन विभाग हादरला आहे. पातूर उपविभागातील खेट्री येथे दोन कोल्हापुरी बंधारे मंजूर झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत. त्यासाठी निधीही खर्च झालेला आहे. या गावात बंधारे निर्मितीला १९९२ मध्ये तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. स्थायी समितीची सभा १६ नोव्हेंबर १९९२ आणि २३ सप्टेंबर १९९२ रोजीच्या सभेत त्यावर चर्चाही झालेली आहे. त्यापैकी एका बंधार्यासाठी ३ लाख १ हजार, तर दुसर्या बंधार्यासाठी ५ लाख ८५ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती आहे. कागदोपत्री दोन बंधारे असल्याच्या नोंदी असल्या, तरी खेट्री गावात सद्यस्थितीत एकच बंधारा अस्तित्वात आहे. त्यामुळे दुसर्या बंधार्याचे काय झाले, याची कोणतीही माहिती ग्रामपंचायतीला नाही. त्यातच गावाच्या नावाने दोन बंधारे असतानाही त्यातून सिंचन होत नाही, परिणामी शेतकरी सिंचन सुविधेपासून वंचित आहेत. त्या बंधार्याची माहिती ग्रामपंचायतीला मिळणे आवश्यक आहे. यासाठी सरपंच अनिता अरुण पजई यांनीच गायब असलेला बंधारा शोधून देण्याची मागणी केली आहे. पंधरा दिवसांपासून माहिती नाही!पातूर उपविभागातील काम असल्याने सरपंचांनी माहिती मिळण्यासाठीचा अर्ज पातूर येथील उपअभियंता कार्यालयात २ जून रोजीच दिला आहे. सोबतच जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभाग कार्यकारी अभियंत्यांनाही पत्र दिले. मात्र, त्या दोन्ही कार्यालयातून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आता लघुसिंचन विभाग चांगलाच अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. खेट्री येथील सरपंचाच्या अर्जाबाबत माहिती घेतली जाईल. आधी काय झाले, त्याचीही माहिती घेऊन सांगता येईल. - ए.व्ही. देशमुख, प्रभारी कार्यकारी अभियंता, लघुसिंचन, जिल्हा परिषद.
कोल्हापुरी बंधारा गायब!
By admin | Published: June 22, 2017 4:41 AM