अकोला, दि. १५- गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान गणेशभक्त धावत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. यामुळे उडालेल्या धावपळीमुळे दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले. ही घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास कोठडी बाजारनजीकच्या चौकात घडली. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गणेशभक्त धावत जाण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस कर्मचारी त्यांना शांततेने जाण्यासाठी सांगत होते; परंतु गणेशभक्त ऐकत नव्हते. शेकडो गणेशभक्त अचानक धावत सुटल्याने गर्दीतील नागरिक घाबरून गेले आणि तेसुद्धा रस्त्याने पळायला लागले. चेंगराचेगरीची शक्यता असल्याने पोलिसांनी धावणार्या काही गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार करून त्यांना चौकाच्या बाहेर काढले. त्यामुळे उडालेल्या धावपळीत दोन चिमुकले किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी तात्पुरता उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले. ताजनापेठ चौकातील पोलीस चौकीमध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, शहर पोलीस उपअधीक्षक प्रदीप चव्हाण, पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, शांतिदूत समितीचे अध्यक्ष अँड. सुधाकर खुमकर, अनिल माहोरे व डॉ. आशा मिरगे आदी उपस्थित होते. नारे देणारा युवक ताब्यात ताजनापेठ चौकातील मोठय़ा मशीदजवळ चिथावणीखोर नारेबाजी करणार्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. हा युवक धार्मिक वातावरण कलुषित होईल. अशा पद्धतीने मशीदजवळ नारेबाजी करीत होता. या ठिकाणी तैनात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुभाष माकोडे व त्यांच्या कर्मचार्यांनी तातडीने युवकाला ताब्यात घेतले. मुस्लीम बांधवांनी केले गणेशभक्तांचे स्वागतमोठय़ा मशीदजवळ गणेशभक्तांची मिरवणूक येताच, मुस्लीम बांधवांनी गणेशभक्तांचे पुष्पहाराने स्वागत केले आणि एकमेकांना आलिंगन देत राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोख्याचा संदेश दिला. गणेश भक्तांनीसुद्धा मुस्लीम बांधवांचे पुष्पहार घालून स्वागत केले.
कोठडी बाजार चौकात गणेशभक्तांवर सौम्य लाठीमार!
By admin | Published: September 16, 2016 3:14 AM