पातूर : बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी गत दोन आठवड्यांपूर्वी कोविड रुग्णालयासाठी स्थानिक विकास निधी अंतर्गत सुमारे एक कोटी रुपये निधी संदर्भातील पत्र जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना सुपुर्द केले होते. त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत हालचाली सुरू झाल्या असून, शहरात लवकरच सुसज्ज कोविड रुग्णालय होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गुरुवारी अधिकाऱ्यांनी येथील डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी केली असल्याची माहिती आहे.
पातूर येथील डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये ऑक्सिजनची सुविधा असलेले कोविड रुग्णालय सुरू केले जाणार आहे. या रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती नाजूक असल्यास त्या रुग्णांना बेड उपलब्ध केले जाणार आहेत. डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने नव्याने तयार करण्यात आलेली इमारत यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. पातूर तालुक्यासह जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी हे कोविड रुग्णालय सोयीचे ठरणार आहे.
-----------------------------
अधिकाऱ्यांनी केली पाहणी
पातूर येथे सुसज्ज कोविड रुग्णालयाच्या हालचाली सुरू झाल्या असून, गुरुवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, तहसीलदार दीपक बाजड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय रामसिंग जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिराग रेवाळे यांनी कोविड हॉस्पिटल उभारणीसंदर्भात पाहणी केली. त्याबरोबरच त्या अनुषंगाने व्यवस्थापनाचे राहुल खंडारे आणि डॉ. साजिद शेख यांच्याशी चर्चा केली.
--------
५० खाटांचे सुसज्ज रुग्णालय
आमदार नितीन देशमुख यांच्या स्थानिक निधीतून शहरात लवकरच ५० खाटांचे सुसज्ज कोविड रुग्णालय सुरू होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यांच्यासाठी अकोला शहरात खाटांची अपुरी संख्या लक्षा घेता पातुरात उभारले जाणारे ५० खाटांचे रुग्णालय फायदेशीर ठरणार आहे.