- संजय खांडेकर
अकोला: महापालिका आयुक्तांना कामकाजाचा अहवाल सादर करण्यासाठी केआरए देणे बंधनकारक होताच आता आयुक्तांनीदेखील अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना केआरए सादर करणे सक्तीचे केले आहे. अकोला महापालिकेच्या कायम आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता दर महिन्यात त्यांनी केलेल्या दैनंदिन कामकाजाचा आढावा द्यावा लागेल. अशी ताकीद महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी केली आहे.अकोला महापालिकेत २ हजाराच्यावर कर्मचारी असूनही महापालिकेचे कामकाज कायम रेंगाळलेले असते. महापालिका कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईपणाचे अनेक नमुने येत असतात. त्यावर उपाय म्हणून नव्याने रुजू झालेले महापालिका आयुक्त कापडणीस यांनी उपरोक्त आदेश काढला आहे. महिनाभर काय काम केले, याची माहिती प्रत्येक कर्मचाºयांनी त्यांच्या वरिष्ठांना दर महिन्याच्या ५ तारखेच्या आत द्यावी. वरिष्ठ अधिकारी एचओडी ही माहिती उपायुक्त यांच्याकडे देतील. त्यानंतर संपूर्ण कामकाजाचा आढावा मनपा आयुक्तांच्या समोर जाणार आहे.अकोला महापालिकेत विविध विभागात कार्यरत असलेल्या कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या १,५०० आहे. कंत्राटी आउट सोर्सिंग तत्त्वावर महापालिकेत ७८ अभियंता कार्यरत आहे. इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या १२१ आणि कत्राटी संगणक परिचालकांची संख्या २८ आहे. याव्यतिरिक्त सफाई कामगारांची संख्या ७४८ आहे. सरसकट कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन हजेरीसाठी महापालिका प्रशासनाने बायोमेट्रिक मशीन लावली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनादेखील त्यासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. दोन हजारच्या कर्मचाऱ्यांची संख्या असूनही कामाची गती संथ आहे. त्यामुळे नेमका वेळ वाया कुठे जात आहे, याचा शोध घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांला आपल्या कामाचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहे. याबाबत मनपा कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी मनपा आयुक्तांच्या आदेशाचे पत्र दाखविले आहे. आता ५ फेब्रुवारीपर्यंत मनपा कर्मचाºयांनी कामकाजाचा काय अहवाल देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.