अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. गत काही दिवसांपासून आजारी असलेल्या कुसुमताई यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. कुसुमताई कोरपे या महाराष्ट्राच्या कापूस उत्पादक शेतकरी चळवळीचे प्रणेते दिवंगत सहकार महर्षी डॉ. वा. रा. उपाख्य अण्णसाहेब कोरपे यांच्या धर्मपत्नी होत.डॉ. कुसुमताई कोरपे यांचा जन्म १९ आॅगस्ट १९२८ रोजी सपकाळ कुटुंबात झाला. त्याकाळातील अकोल्यातील नामवंत कायदेपंडीत व राजकीय पुढारी अॅड. श्रीधर गोविंद सपकाळ हे त्यांचे वडील होत. त्यांचे ज्येष्ठ बंधू माजी मंत्री स्व. निळकंठ श्रीधर उपाख्य नानासाहेब सपकाळ हे सुप्रसिद्ध वकील आणि सहकार नेते होते. कुसुमताई यांचे माहेर व सासर ही दोन्ही घराणी समाजसेवेचे व्रतस्थ असल्यामुळे त्यांचाही पींड समाजसेवेचा बनला. सुरवातीपासूनच त्यांचा ओढा विद्यार्जनाकडे राहिला. विवाहानंतरही त्यांनी विद्यार्जन ठेऊन एम. ए. ची पदवी संपादन केली. नागपूर विद्यापीठाने विदर्भातील २० व्या शतकातल ग्रामीण नेतृत्वाचा विकास हा त्यांचा शोध प्रबंध स्वीकारून त्यांना डॉक्टरेट पदवी बहाल केली. समाजसेवेला ज्ञानाची जोड मिळाल्यामुळे त्यांचे राजकीय, सहकारी व शैक्षणिक क्षेत्रातीील समाजकार्य प्रभावी राहिले. १९५७ ते १९६७ या दहा वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक समाजोपयागी कार्ये केली. मुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत. जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. विधानसभेत त्यांनी आपल्या मतदारसंघातील व जिल्ह्यातील जनसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडली. सिलिंग व कुळकायदा या बाबतचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनिय राहिले आहे. महाराष्ट्र को. आॅप. हाऊसिंग फायनान्स सोसायटी लि. मुंबई या सहकारी गृहनिर्माण क्षेत्रातील राज्यस्तरावरील संस्थेवर त्या संचालिका म्हणून राहिल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्था व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या त्या आजीव सदस्या होत्या. राजकीय व सामाजीक क्षेत्रात वावरतानाच आदर्श गृहिनी,आदर्श पत्नी व आदर्श माता या भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांची दोन मुले व तीन मुली वैद्यक शास्त्रात उच्च विद्याविभूषित होऊन मानवी सुश्रृषेच्या पवित्र कार्यात व्रतस्थ आहेत.
अकोल्यातील पहिल्या महिला आमदार कुसुमताई कोरपे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 1:17 PM
अकोला : अकोला जिल्ह्यातील पहिल्या महिला आमदार होण्याचा बहुमान मिळविणाºया डॉ. कुसुमताई कोरपे यांचे सोमवार, ३० आॅक्टोबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
ठळक मुद्देमुर्तीजापूर मतदार संघातून त्या दोन वेळा आमदार राहिल्या आहेत.