अकोला : ‘लाेकमत’चे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधत ‘लाेकमत’ने रक्तदान महायज्ञाचे आयाेजन केले आहे. शुक्रवारी अकाेल्यात या महायज्ञाचा शुभारंभ राष्ट्रीय प्रबाेधनकार, सप्त खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.
स्थानिक सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, आयएमएचे सचिव डॉ. तेजस वाघेला, डॉ. श्यामकुमार सिरसाम, लोकमत अकोला आवृत्तीचे युनिट हेड आलोककुमार शर्मा, लोकमत अकोला आवृत्तीचे कार्यकारी संपादक किरण अग्रवाल, लोकमत समाचारचे प्रभारी अरुणकुमार सिन्हा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
स्वर्गीय बाबूजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या वेळी बाेलताना सत्यपाल महाराज यांनी आपल्या विनाेदी शैलीत समाजातील अनिष्ट रूढी, परंपरांसह रक्तदानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या प्रवृत्तीविराेधात आसूड ओढले.
देवाला दुधाचा अभिषेक केल्यापेक्षा रुग्णाच्या शरीरात रक्ताचा एक एक थेंब रुग्णाचा प्राण वाचवीत असेल, तर ते माेठे सामाजिक काम आहे. कोरोनाच्या काळात ‘लोकमत परिवारा’ने रक्तदान महायज्ञाच्या निमित्ताने समाजाशी रक्ताचे नाते जोडल्याचे स्पष्ट करत स्वर्गीय बाबूजींनी लाेकमत परिवाराच्या माध्यमातून जपलेली सामाजिक बांधिलकी आजही तेवढ्याच पाेटतिडकीने जपली जाते, असे गाैरवोद्गार त्यांनी काढले. गल्लीबाेळांत लहानशा वादातून एकमेकांची डाेकी फाेडली जातात, त्यामध्ये रक्त सांडता; पण बापहाे... असे भांडणे करून नाल्यांमध्ये रक्त सांडण्यापेक्षा रक्तदान करून रुग्णाच्या नाड्यांमध्ये रक्त खेळू द्या, त्यांचा जीव वाचू द्या, असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविकामध्ये कार्यकारी संपादक किरण अग्रवाल यांनी रक्तदान महायज्ञामागील भूमिका विशद केली. ते म्हणाले, आमच्या पिढीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनाही बघितले नाही; पण समाजप्रबोधनातून समाजाला दिशा दाखविणारे सत्यपाल महाराज यांच्या रूपाने त्यांचा समर्थ वारसा पुढे नेत असून, त्यांच्या हस्ते या महायज्ञाला सुरुवात होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. कोरोनाकाळात जिल्हाधिकारी पापळकर यांच्यासह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आरोग्यसेवा उत्कृष्टरीत्या सांभाळल्याचे प्रतिपादनही त्यांनी या वेळी केले. संचालन लाेकमतच्या आदिती कुलकर्णी यांनी केले. या वेळी रेडक्रॉसचे मानद सचिव व सामाजिक कार्यकर्ते प्रभेजितसिंग बछेर, कार्यकारी सदस्य डाॅ. के.एन. माहेश्वरी आदी प्रामुख्याने उपस्थित हाेते. राज्यभरात १४ दिवस चालणारा रक्तदानाचा हा महायज्ञ जिल्ह्यातील विविध ठिकाणी चालणार आहे. पहिल्याच दिवशी रक्तदान शिबिराच्या नोंदणीस विविध सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.
पहिल्याच दिवशी ५०६ रक्तदात्यांचा सहभाग
‘लाेकमत रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाच्या पहिल्याच दिवशी ५०६ दात्यांनी रक्तदान केले. यामध्ये विशाखा बुद्धविहार येथे २४६, राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅम्पमध्ये २५, बार्शिटाकळी ७५, अकाेट येथील सेंट पाॅल ॲकॅडमीमध्ये ४१ आणि आयएमए हाॅलमध्ये १० रक्तदात्यांनी सहभाग घेतला.
उद्या येथे हाेणार रक्तदान
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
लेडी हार्डिंग, डाॅ. हेडगेवार रक्तपेढी, साई जीवन रक्तपेढी यांचे मिळाले सहकार्य
डाॅ. सुनील जाेशी, डाॅ. कुंदन चव्हाण, डाॅ. नंदकुमार गुजलवार, डाॅ. मयूर वाकाेडे, डाॅ. शिल्पा तायडे, डाॅ. रमेश देशपांडे यांच्या चमूने रक्त संकलनासाठी मदत केली.