अकोला : रणपिसेनगर परिसरातील रहिवासी शरद हिंगे यांचे नवे घर बांधण्यासाठी जुने घर पाडण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असताना मजुराच्या अंगावर स्लॅब कोसळल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून मलब्यात दबलेल्या मजुराला बाहेर काढले, मात्र उपचारासाठी रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. प्राप्त माहितीनुसार, रणपिसेनगरातील रहिवासी शरद हिंगे यांच्या घराच्या बांधकामासाठी वरील मजल्यावरील स्लॅब पाडण्याचे काम सुरू होते. याठिकाणी तीन मजूर काम करत हाेते. दरम्यान बाजूला असलेल्या भिंतीला अचानक तडे गेल्याने घराचा स्लॅब कोसळला. प्रसंगावधान न बाळगल्याने दोन मजुरांचा जीव बचावला, मात्र स्लॅबच्या मलब्याखाली एक मजूर दबला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मलब्याखाली दबलेल्या मजुराला बाहेर काढण्यात यश आले, मात्र रुग्णालयात दाखल होताच डॉक्टरांनी त्या मजुराला मृत घोषित केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अदिकारी डॉ. निलेश अपार यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
हायड्रोलिक जॅकच्या मदतीने उचलला स्लॅब
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची चमू घटनास्थळी पोहोचली. कोसळलेल्या स्लॅब खाली दबलेल्या मजुराला बाहेर काढणे कठीण होते. त्यामुळे अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांसाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या हायड्रोलिक जॅकची मदत घेऊन कोसळलेला स्लॅब उचलला व त्या खाली दबलेल्या मजुराला बाहेर काढल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली.