बार्शीटाकळी तालुक्यातील लोहगड तांडा येथील रहिवासी असलेले रवी नीळकंठ राठोड (४०) हे गुजरात राज्यात एका खासगी कंपनीत काम करीत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे. कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये, या भीतीने रवीने मूळगावी येण्याचे ठरविले. त्यानुसार ते कुटुंबासह जीवनावश्यक साहित्य घेऊन ते रेल्वेस्थानकात पोहोचले. दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गुजरातमधील वापी रेल्वे स्थानकातून भुसावळकडे प्रस्थान करणाऱ्या रेल्वेच्या डब्यात रवीने पत्नी व मुलांना साहित्यासह चढवून दिले. रेल्वे सुरू होताच चढताना रवीचा पाय घसरून ते रेल्वे खाली आले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लोहगड येथे या घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक गुजरातकडे रवाना झाले. मृतदेहाचे शवविच्छेदन करून शनिवार, दि.२४ एप्रिल रोजी रवी राठोड यांच्यावर लोहगड तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, सात वर्षांचा मुलगा, पाच वर्षांची मुलगी व भावंडे आहेत. गुजरात सरकारने मृतकाच्या कुटुंबाला मदत जाहीर करावी, अशी मागणी लोहगडवासीयांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने घरी परतणाऱ्या मजुराचा रेल्वे अपघातात मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 4:18 AM