--------------------------------
खाद्य तेलाचे भाव गगनाला, गृहिणींचे बजेट कोलमडले!
खिरपूरी बु.: गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गामुळे देशात आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. दैनंदिन वापरात येणाऱ्या खाद्यतेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.
-----------------------------------
रस्त्यालगत भाजीविक्रेत्यांचा ठिय्या
वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर तसेच चौकालगत भाजी, फळ, तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-----------------------------------
वन्य प्राण्यांची नागरी वस्तीकडे धाव!
तेल्हारा: वन्य प्राणी पाण्याच्या शोधात नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहेत. तालुक्यातील दापुरा, हिंगणी, सौंदाळा, पंचगव्हाण आदी शिवारांतील तलावाचे पाणी आटल्याने प्राणी गाव वस्तीकडे धाव घेत आहे. त्यामुळे पाणवठे निर्माण करण्याची मागणी होत आहे.
---------------------------------
पिकांना बसतोय उन्हाचा फटका!
अकोट: एप्रिल महिना सुरू होताच, उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे बागायती पिकांना फटका बसत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा, भुईमूग पिकाची पेरणी केली. पिकांना तापमानाचा फटका बसत असून, शेतकरी चिंतेत सापडले आहेत.
-----------------------------
कोरोनाचा प्रादुर्भाव; नागरिकांची पाठ
बार्शीटाकळी : शहरात काेराेनाचा प्रसार झपाट्याने हाेत आहे. फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याची सूचना केली जात असतानाही नागरिकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. दुर्लक्षतेमुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
--------------------------------
वाडेगाव परिसरात अवकाळी पाऊस
वाडेगाव : परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. परिसरात सद्यस्थितीत उन्हाळी पिके व भाजीपाला वर्गीय पिके बहरलेली आहेत. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. पावसाला सुरुवात होताच, वीजपुरवठा खंडित झाला होता.
---------------------------------
ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक
बाळापूर: गेल्या पंधरवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी प्राप्त अहवालानुसार, तालुक्यात तब्बल २५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.