कपाशीची वेचणी अंतिम टप्प्यात
अकोला : गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता आहे त्या कपाशीवर अवकाळी पावसाचे संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी कपाशीच्या वेचणीला लागले असून, ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून, काही ठिकाणी तुरळक पाऊसही पडल्याने कपाशीचे नुकसान होऊ शकते.
जुने शहरात ठिकठिकाणी गतिरोधक
अकोला : जुने शहरातली प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. हे गतिरोधक चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्याने वाहनधारकांना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे. अनेकांना पाठीच्या मणक्यांचा त्रास होत आहे. प्रशासनाने रस्त्यावरील चुकीच्या पद्धतीने निर्मित गतिरोधक काढण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पंचायत समितीसमोर अस्ताव्यस्त पार्किंग
अकोला : शहरातील पंचायत समिती परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांची अस्तव्यस्त पार्किंग असल्याचे दिसून येते. हा वळण मार्ग असून, येथे नेहमीच वर्दळ असते. वाहने रस्त्यावरच उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.