अकोला : कोविडनंतर आता म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजाराच्या उपचारांसाठी इतर जिल्ह्यातील रुग्ण अकाेल्यात दाखल होत आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्ह्यात ऍम्पोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. आतापर्यंत सर्वोपचार रुग्णालयात सुमारे ३३०० इंजेक्शनचा वापर झाला असून, एका रुग्णाला दिवसाला पाच इंजेक्शन द्यावे लागत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. म्युकरमायकोससिचा फैलाव रोखण्यासाठी ऍम्पोटेरेसिन बी नावाचे हे इंजेक्शन प्रभावी ठरत आहे. इतर जिल्ह्यात या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यातील बहुतांश रुग्ण उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. म्युकरमायकाेसिसच्या रुग्णावर साधारणत: १४ दिवस उपचार चालतो. उपचारांदरम्यान म्युकरमायकोसिसचा फैलाव रोखण्यासाठी रुग्णाला दिवसाला पाच इंजेक्शन द्यावे लागत आहेत. त्यानुसार, आतापर्यंत ३३०० इंजेक्शनचा वापर सर्वोपचार रुग्णालयात झाल्याची माहिती आहे. सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऍम्पोटेरेसिन बी इंजेक्शनची मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यात ऍम्पोटेरेसिन बीचा तुटवडा भासत आहे.
दररोज करावी लागते इंजेक्शनची मागणी
दाखल रुग्णसंख्येनुसार सर्वोपचार रुग्णालय प्रशासनातर्फे आरोग्य उपसंचालक कार्यालयात दररोज ऍम्पोटेरेसिन बी इंजेक्शनची मागणी करावी लागते. आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध इंजेक्शनमधून पुरवठाही केला जातो; मात्र मागणीच्या तुलनेत इंजेक्शन कमी प्रमाणात दिले जातात. रुग्णालय प्रशासनाला ही कसरत रोजच करावी लागत आहे.
...तर फंगसचा होऊ शकतो मेंदूत शिरकाव
म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची सुरुवात साधारणत: रुग्णाच्या नाकातून किंवा तोंडातून होते. हळूहळू या बुरशीचा फैलाव रुग्णाच्या डोळ्यांमध्ये व नंतर मेंदूपर्यंत होऊ शकतो. वेळीच उपचार न मिळाल्यास रुग्णाचा डोळा काढण्याची वेळ येऊ शकते. तसेच फंगस मेंदूमध्ये शिरल्यास रुग्णाचा जीव वाचविणे कठीण असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी रुग्णांना इंजेक्शन देणे गरजेचे आहे; मात्र मागणीच्या तुलनेत ते मिळत नाही. इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. डॉक्टरांसोबतच वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून रुग्णाच्या उपचारांसाठी आवश्यक सर्वच प्रयत्न करीत आहेत.
- डॉ. दिनेश नैताम, वैद्यकीय उपअधीक्षक, जीएमसी, अकोला