लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून, शहरवासीयांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे; मात्र लसीकरण केंद्रात होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. येथील लसीकरण केंद्रात नागरिकांची गर्दी होत असून, केंद्र परिसरात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. गर्दीमुळे वृद्धांना ताटकळत बसावे लागत आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. याठिकाणी सकाळी एक ७० वर्षीय ज्येष्ठ लस घेण्यासाठी आले, परंतु गर्दीमुळे त्यांना ताटकळत बसावे लागले. ही बाब लक्षात आल्यानंतर या ज्येष्ठाच्या लसीकरणासाठी चंचल पिताबंरवाले या युवतीने पुढाकार घेतला. लसीकरण केंद्रात वृद्धांना बसण्यासाठी सावली नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. तसेच लसीकरणासाठी आलेले नागरिक चक्क फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे अशा सर्व नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. लसीकरणाचे नियोजन होत नसल्यामुळे गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. एक ७० वर्षीय वृद्ध सकाळपासून लस घेण्यासाठी रांगेत उभे होते; मात्र त्यांच्या वयाचा विचार न करता, त्यांना ताटकळत ठेवण्याचा अक्षम्य प्रकार याठिकाणी घडला. अखेर या वृद्धाची चंचल पितांबरवाले यांनी विचारपूस केली असता, वृद्ध रडायला लागले. त्यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर चंचल पितांबरवाले यांनी प्रशासनाला याबाबत अवगत केले. प्रशासन ऐकत नसल्याचे बघून त्यांनी जाब विचारला असता, त्यांनाच पोलिसांना बोलावण्याची धमकी देण्यात आली. अखेर उपस्थितांनी या वृद्धांना आधी लस द्या, अशी मागणी केल्यानंतर त्यांना लस देण्यात आली. ग्रामीण रुग्णालयात प्रशासनाने लसीकरणासाठी दोन केंद्र सुरू करावी, अशी मागणी महिला युवा नेत्या चंचल पितांबरवाले यांनी केली आहे.