अकोला : यावर्षी पीके उत्तम असताना अचानक पावसाने एक महिन्याची दडी मारल्याने खारपाणपट्टयातील कपाशीसह सोयाबीन पिकावर परिणाम झाला असून, काही भागातील कपाशीचे उत्पादन अल्पसे कमी तर सोयाबीनचे उत्पादन ४० ते ४५ टक्के कमी होण्याची शक्यता आहे.पश्चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४० ते ५० किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यांतील १६ तालुक्यांतील ८९२ गावे या खारपाणपट्ट्यात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र आहे. खारपाणपट्ट्यातील माती चोपण असून, पिण्याचे पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषी माल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतोच, यावर्षी सुरू वातीली पेरण्यांना उशीर झाला होता पण त्यानंतर चांगला पाऊस होत गेल्याने सर्वच पिके बहरली होती पण ऐन कपाशीला फुले,पाते,सोयबीन फुलोरा येण्याच्या अवस्थेत पावसाचा एक महिन्याचा खंड पडल्याने बरड भागातील या पिकांवर परिणाम झाला. पाहिजे त्या प्रमाणात फुले,पाते न धरल्याने कपाशीचे अपेक्षित उत्पादनावर अल्पसा परिणाम होण्याची शक्यता आहे. सोयाबी पिकांच्या शेंगा न भरल्याने ४० ते ४५ टक्के उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पंरतु ज्यांनी २० जूननंतर सोयाबीनची पेरणी केली तेथील सोयाबीन उत्तम स्थितीत आहे. गेल्या तीन ते चार दिवस परतीच्या पावसाने संजिवनी मिळाली आहे. कापूस पिकालाही पोषक ठरला आहे.
- बरड,हलक्या जमिनीतील कपाशीच्या पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम होवू शकतो पण यावर्षी सर्वच पिके उत्तम असून, परतीच्या पावसाने ही पीक तरली आहेत.- डॉ. मोहन खाकरे,ज्येष्ठ कृषी विद्यावेत्ता,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.