- प्रवीण खेते
अकोला : मागील काही वर्षांत जिल्हा स्त्री रुग्णालयावरील ताण वाढला आहे, त्या अनुषंगाने १०० खाटांची नवी इमारत प्रस्तावित होती. या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, नव्या वर्षात येथे ‘मॅटर्नल चाइल्ड हेल्थ विंग’ सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. गत वर्षभरात कोविडमुळे आरोग्य विभागातील अनेक रखडलेली कामे मार्गी लागली, त्यामुळे नव्या वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागात रुग्णांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रामुख्याने जिल्हा स्त्री रुग्णालयाचा विचार केल्यास येथील प्रस्तावित ‘मॅटर्नल चाइल्ड हेल्थ विंग’ २०२१ मध्ये सुरू होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. शंभर खाटांची व्यवस्था असलेल्या या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, सध्या ही इमारत ५० खाटांच्या कोविड सेंटरसाठी राखीव ठेवलेली आहे. सेंटर सुरू झाल्यापासून या ठिकाणी एकही रुग्ण दाखल झाला नाही. सद्यस्थितीत रुग्णालय प्रशासनाने १०० खाटा उपलब्ध झाल्या असून, लवकरच उर्वरित कामे पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार वर्षभरातच हे काम पूर्णत्वास येऊन ‘मॅटर्नल चाइल्ड हेल्थ विंग’ सुरू होणार आहे.
या राहणार सुविधा
- दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर (ओटी)
- १० खाटांचे आयसीयू
- १० खाटांचे ‘पीआयसीयू’ (लहान मुलांसाठी)
- स्वतंत्र लेबर रूम
काय आहे ‘पीआयसीयू’?
पीआयसीयू म्हणजेच पेडिॲट्रिक आयसीयू असून, या ठिकाणी गंभीर प्रकृती असणाऱ्या लहान मुलांवर उपचार केले जातात. जिल्हा स्त्री रुग्णालयात सध्या एसएनसीयू असून, यामध्ये २८ दिवसांपर्यंतच मुलांना ठेवण्याची परवानगी आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी बालरुग्णांना जीएमसीत संदर्भित करावे लागत होते; मात्र जिल्हा स्त्री रुग्णालयातच पीआयसीयू सुरू होणार असल्याने येथेच बालरुग्णांवर उपचार करणे शक्य होणार आहे.
नवीन वर्षात जिल्हा स्त्री रुग्णालयात ‘मॅटर्नल चाइल्ड हेल्थ विंग’ सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. नव्याने सुरू होणाऱ्या विंगमध्ये चांगल्या सुविधा मिळणार आहेत, तसेच ‘एसएनसीयू’सोबतच आता लहान मुलांसाठी ‘पीआयसीयू’ देखील असणार आहे.
- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकाेला