काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केल्यानंतर आता ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यादरम्यान, गरजू व गरीब नागरिकांना दाेन वेळच्या जेवणाची साेय उपलब्ध करून देण्याच्या आश्वासनाचा समावेश आहे. यामध्ये गरजूंना मोफत धान्य व शिवभाेजन केंद्रांच्या माध्यमातून माेफत थाळी देण्याचा समावेश आहे़ स्थलांतरित मजूर, बाहेरगावचे विद्यार्थी व बेघरांना मोफत शिवभोजन थाळी देण्याचे शासनाचे निर्देश आहेत. जिल्ह्यात प्रत्यक्षात २६ लाख लाेकसंख्या असून, जिल्ह्यात १५ केंद्रांच्या माध्यमातून फक्त ३ हजार थाळींचे वितरण करण्याचा आदेश शासनाने दिला आहे. शुक्रवारी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ. रणधीर सावरकर यांनी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सामान्य जिल्हा स्त्री रुग्णालय, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली असता अल्प वेळेतच थाळीचे वाटप करण्यात आल्याचे दिसून आले. यामुळे अनेक गरजूंना परत जावे लागल्याचा प्रकार समाेर आला.
फोटो :
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट
गरजूंना माेफत अन्नधान्य व थाळीचे वाटप केले जात नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत आ. रणधीर सावरकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसाेबत संवाद साधण्यात आला असता माेफत अन्नधान्य वाटपासंदर्भात अद्यापपर्यंत शासनाचे निर्देश प्राप्त झाले नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी बबनराव काळे यांनी सांगितले. यावेळी आ. गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, जयंत मसने आदी उपस्थित हाेते़