लाखपुरी : मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी सर्कलमधील दातवी, मंगरूळ कांबे, जांभा, लाईत, रसलपूर, रेपाटखेड, दुर्गवाडा, सांगवी वाघझडीसह इतर गावांतील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. त्यामुळे या मार्गाने अपघाताच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत दि. २६ मार्च रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. वृत्त प्रकाशित होताच संबंधित विभागाला जाग येऊन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
लाखपुरी-दातवी रस्ता जीवघेणा झाल्यामुळे संपूर्ण वाहनधारक व विद्यार्थी त्रस्त झाले होते. या मार्गावरील रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लाखपुरी-दातवी, मंगरूळकांबे, जांभा, रेपाटखेड, पायटांगी, दुर्गवाडा रस्त्यांचीही दयनीय अवस्था झाली आहेत. माजी पंचायत समिती सदस्या मीनल नवघरे यांनी यांनी दि. २३ मार्च २०२१ रोजी निवेदन देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच आठ दिवसात प्रश्न मार्गी न निघाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत दि. २६ मार्च रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत अखेर दि. ४ एप्रिलपासून रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे. (फोटो)