संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे अधिकारी आणि दलालांच्या संगनमताने झाले असून यामध्ये मुंबई व अमरावतीमधील तीन वरिष्ठ अधिकारी आणि अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी गुंतल्याची निनावी तक्रार मंत्रालयात पोहचली आहे. या तक्रारीवर सरकारदरबारी काय निर्णय होतो, याकडे येथील उद्योजकांचे लक्ष लागले आहे. अकोला एमआयडीसीतील प्लॉट नं. टीए-६0, टीएम -२४, टीएम -६२, टीएम १३७, टीएम-२३७ या वरील बांधकाम अवैध सुरू होते. जेव्हा टीए-६0 च्या बांधकामावर आक्षेप घेत कारवाई सुरू झाली, तेव्हा एमआयडीसीतील प्लॉट ओनर्स असोसिएशनने अमरावतीच्या अधिकार्यावर दबाव आणून इतर प्लॉटवरील अनधिकृत बांधकाम सुरु ठेवले. यासाठी प्रादेशिक अधिकार्यांना धमक्यादेखील दिल्या.यामध्ये एका लोकप्रतिनिधीची साथही या असोसिएशनला मिळाली. अमरावतीच्या विभागीय कार्यालयात जाऊन या असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी गोंधळ घातला, असे मुंबईत पाठविण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. एमआयडीसीचे माजी मुख्य अधिकारी जे अकोल्याचे जावईदेखील आहेत, त्यांच्या नावाचा थेट उल्लेखही तक्रारीत आहे. एमआयडीसीतील ओपन स्पेस नं. टी-४२ ला बदलण्यासाठी असोसिएशनच्या पदाधिकार्यांनी मोठी रक्कम घेतल्याचाही आरोप असून ५0-६0 लाख रुपये देणार्यांना पाहिजे तो भूखंड वितरित केला करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तसेच असोसिएशनचे पदाधिकारी आणि तीन वरिष्ठ अधिकार्यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
उद्योग संजीवनी योजनेचा दुरुपयोगअकोल्यातील असोसिएशनच्या पदाधिकार्यांनीआपल्या पदाचा दुरुपयोग करुन उद्योग संजीवणी योजनेमध्ये काही उद्योजकांना महत्वाचे भूखंड मिळवून दिले. या माध्यमातून २0 कोटी रुपयांची माया गोळा केल्याचा गंभीर आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.
चौकशीसाठी आम्ही तयार !मुंबईत पोहोचलेल्या तक्रारीतील आरोप बिनबुडाचे आणि निराधार आहेत. व्यक्तिगत आणि असोसिएशनचे पदाधिकारी म्हणून आम्ही कोणत्याही चौकशीसाठी तयार आहोत.-सुरेश काबरा, अध्यक्ष, एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशन, अकोला.