अकोला : उमा बॅरेज प्रकल्पांतर्गत लंघापूर येथील पूर्णत: बाधित ३०५ प्रकल्पग्रस्तांसाठी मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील पुनर्वसित गावठाणात भूखंड निश्चित करण्यासाठी गुरुवार व शुक्रवारी सोडत काढण्यात आली असून, त्यामध्ये इश्वर चिठ्ठी पद्धतीने भूखंड निश्चित करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते.
सिरसो येथील पुनर्वसित गावठाणामध्ये नगररचना विभागाच्या नियमानुसार मंजूर अभिन्यास नकाशाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सोडतमध्ये संभाजी मंगेश पाचडे या बालकाच्या हस्ते इश्वर चिठ्ठी काढून ३०५ प्रकल्पग्रस्तांचे भूखंड निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भूखंड निश्चित करण्यासाठी सोडत काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी उमा बॅरेज प्रकल्पाचे प्रशासक तथा उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, प्रकल्प यंत्रणेचे कार्यकारी अभियंता अमित राऊत, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ, उपविभागीय अभियंता अविनाश साल्पेकर आदी उपस्थित होते.
असे निश्चित करण्यात आले भूखंड !
३०५ प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड निश्चित करण्यात आले. त्यामध्ये १८५ चौरसमीटरचे १४३ भूखंड, २७७.५ चौरसमीटरचे २६ भूखंड, ३७० चौरसमीटरचे ११४ भूखंड, ५५५ चौरस मीटरचे २० आणि ७४० चौरस मीटरचे २ असे एकूण ३०५ भूखंड निश्चित करण्यात आले, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) सदाशिव शेलार यांनी दिली.