गजानन वाघमारे
बार्शीटाकळी: कृषी विभागामार्फत तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीत जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात आले आहेत. त्यानुसार, ज्या शेतकऱ्यांनी मातीचा नमुना काढला नाही, त्या शेतकऱ्यांना हे फलक मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागणाऱ्या उत्पादन खर्चात बचत होणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावाच्या शिवारातील जमिनीमध्ये उपलब्ध सूक्ष्म अन्नद्रव्ये व इतर घटकांची माहिती, त्यानुसार आवश्यक असणारे खत पीकनिहाय किती प्रमाणात द्यायचे याबाबत सविस्तर मार्गदर्शक ठरणारे जमीन सुपिकता निर्देशांक फलक जालना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याची मोहीम कृषी विभागामार्फत आयोजित केली होती. त्याच धर्तीवर बार्शीटाकळीचे तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांचे मार्गदर्शनात तालुक्यातील ग्रामीण भागात जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आलेले फलक तयार करण्यासाठी मागील तीन-चार वर्षांत गोळा केलेल्या मातीच्या नमुन्यांचे परीक्षण करून तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिकांचा वापर करण्यात आला आहे. जमीन सुपिकता निर्देशांक तयार करताना चार घटकांवर आधारित एका गावाचे बारा वेगवेगळ्या प्रकारचे निर्देशांक तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांचाही विचार करण्यात आला आहे. कृषी विभागामार्फत लावण्यात आलेल्या फलकांचा आधार घेऊन शेतकरी आपल्या शिवारातील जमिनीमध्ये कोणती मूलद्रव्ये कमी प्रमाणात आहेत, तसेच कोणत्या पिकांची निवड करावी, त्यांचे चांगले उत्पन्न घेण्यासाठी किती मात्रेत खतांचा वापर करायचा, हे ठरवू शकणार आहेत. ज्या शेतकऱ्यांनी मातीचा नमुना काढला नाही, त्या शेतकऱ्यास गावाच्या सुपिकता निर्देशांकावरून ढोबळ मानाने खताची मात्रा ठरविण्यास मदत होणार आहे. आपल्या क्षेत्रासाठी किती खत आणणे आवश्यक आहे, त्याचे नियोजन करता येणार आहे. सद्य स्थितीत बाजारामध्ये अनेक प्रकारची खते उपलब्ध आहेत. त्यांच्या किमती व त्यामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण वेगवेगळे आहे. यामुळे खतांचा अवाजवी वापर टाळून जमिनीचे आरोग्य राखण्यास मदत होणार आहे, तसेच अनावश्यक खतांवरील खर्चात बचत झाल्याने उत्पादन खर्च कमी होऊन खर्चात बचत होणार आहे. (फोटो)
-------------
या कारणांमुळे जमिनीची सुपिकता झाली कमी!
असमतोल अन्नद्रव्यांचा वापर, अमर्याद सिंचनाचा वापर, रासायनिक खते देण्याची चुकीची पद्धत, वेळ आणि मात्रा यामुळे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे. सूक्ष्म जिवाणूंची संख्या कमी झाली असून, जमिनीच्या वाढत चाललेल्या अपधावाच्या प्रमाणामुळे एक इंच सुपीक थर पाण्याबरोबर अन्नद्रव्यांसह वाहून जातो, अशा विविध कारणांमुळे जमिनीचा सुपीकता निर्देशांक कमी होत आहे, असे तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी सांगितले.