अकोला: शहरातील झोपडपट्टीवासीयांना जमीनीचे मालकी पट्टे देण्यात यावे, झोपडपट्टी वसाहतीत नागरी सोयी सुविधा उपलब्ध करण्यात याव्या, अशा विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारित अकोला विकास संघर्ष मंचच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
राज्य शासनाच्या धोरणानुसार अकोला शहरातील पात्र झोपडपट्टीधारकांना त्यांच्या भोगवटयाखालील घराच्या जमीनीचा मालकी हक्काचा भाडेपट्टा करुन देण्यात यावा, २०११ पूर्वी झोपडपट्टीधारकांनी निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमाकूल करण्यात यावी, प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल झाेपडपट्टीधारकांना घरकुल बांधकामासाठी जमीनीचा भाडेपट्टा देवून आवास योजनेचा लाभ देण्यात यावा, घरकुलांसाठी अनुदान देण्यात यावे, रमाइ आवास योजना, शबरी आवास योजना व इतर आवास योजनेतून झोपडपट्टीधारकांना घरकुलांसाठी अनुदान देण्यात यावे, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील बेघर व गरिबांसाठी सरकारी जमीनीवर घरकुलांची योजना राबविण्यात यावी, झोपडपट्टी वसाहतींमध्ये मूलभूत नागरी सोयी सुविधा व नळ योजनेव्दारे शुध्द पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, बटार, शौचालय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्या, अशा विविध मागण्यांसाठी अकोला विकास संघर्ष मंचच्यावतीने शहरातील गांधी जवाहर बागपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. या मोर्चात सुरेखा वाहने, संजय राऊत, राजकुमार रंगारी, साधना खिल्लारे, पंकज काळे, कृष्णा घरडे, पंचफुला मोरे, रत्ना भाकरे, गुलाब खैरे, प्रकश शिरसाट, शंकर इंगोले, रामचंद्र धनभर, जयदेव भोकरे, महेश गावी,दुर्गा वार, पंकज खंडारे, शेख पिरु मलंग गवळी, विष्णू भालेराव, दुर्गा मोहिते, नसीम बी शेख वाहिद, सिंधू भिमकर,शारदा सोनोने आदींसह शहरातील विविध भागातील झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.घोषणांनी दणाणला परिसर; मागण्यांकडे वेधले लक्ष !मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोहोचल्यानंतर मोर्चात सहभागी आंदोलक झोपडपट्टीधारकांनी निदर्शने करीत विविध घोषणा करीत मागण्यांकडे प्रशासन व शासनाचे लक्ष वेधले. ‘ जमीनीचे पट्टे मिळालेच पाहजे, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, झोपड्यांचा विकास झाला पाहीजे, गरिबांना घरकुल मिळाले पाहीजे ’ अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील चौक परिसर दणाणून गेला होता.मोर्चात महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय !शहरातील झोपडपट्टीधारकांच्या या मोर्चात महिला आंदोलकांची संख्या लक्षणीय होती. मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभागी आंदोलक महिलांनी घोषणा देत मागण्यांकडे लक्ष वेधले.