मर्क्युरी पारा, ऑक्साइड तसेच विषारी पदार्थ जप्त
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पातूर रोडवर मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाने सोमवारी रात्री बेड्या ठोकल्या. या टोळीकडून मर्क्युरी पारा, ऑक्साइड, मिरची पावडर, धारदार शस्त्र, दोर तसेच ज्वलनशील पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये एका महिला आरोपीचाही समावेश असून, कारसह तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील वाडी व आसलगाव येथील रहिवासी विलास प्रकाश काळे (वय ३९), कैलास धुदन पवार (६०), विजय कैलास पवार (४०), सूरज विजू पवार (२०) व शीतल विलास भोसले (३८, राहा. वाडी) व आसलगाव हे पाच जण कारमध्ये (क्र. एमएच ०४ डीएन ४२६) पातूर रोडवर संशयास्पद हालचाली करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून विलास पाटील यांनी पथकासह पाळत ठेवून या पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून कार जप्त करण्यात आली असून, कारमधून तीन बोटल पारा मर्क्युरी ऑक्साइड, एक बॉटल ॲसिड, एक धारदार शस्र, एक दोर, मिरची पावडर, पाच मोबाइल व इतर मुद्देमाल असे एकूण तीन लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या पाचही आरोपींना याविषयी तसेच ज्वलनशील पदार्थ व शस्त्राविषयी माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी पाचही आरोपींना जुने शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीनुसार हे पाचही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींवर बुलडाण्यात गुन्ह्यांची मालिका
आराेपींची चौकशी केली असता या टोळीतील पाचही आरोपीविरुद्ध नांदुरा, जळगाव जामोद, बुलडाणा व मलकापूर या चार तालुक्यात फसवणूक व शरीरास नुकसान करण्यासारखे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.