खेट्री : पातूर तालुक्यातील चतारी-खेट्री परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी केली. यामध्ये भुईमुगाचा पेरा जास्त आहे; परंतु विहिरी आटल्या, कृषी मार्गदर्शन नाही व विविध रोगांमुळे भुईमुगाचे पीक करपल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. सततच्या नापिकीमुळे चतारी-खेट्री परिसरातील शेतकरी कर्जबाजारी झाले असून, हवालदिल झाले आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या लागवडीचा खर्चही निघाला नाही. तरीही शेतकऱ्यांनी जिद्दीने पुन्हा बँक व सावकाराकडून पैसे व्याजाने काढून रब्बी पिकांची पेरणी केली; परंतु भुईमूग पिकाच्या लागवडीकरिता झालेला खर्चही निघत नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील सुभाष बंड, गजानन चंढाळणे, गजानन ढोरे, बाळू साळोकार, बाळू शेंडे, संजू मुळे, पुंडलिक बगे, शत्रुघ्न मानकर, दिनेश मांजरे, अनंता गवळी, राजाराम मुंडे, सुभाष साभळे, महादेव निलखन, वामन बदरखे, श्रीराम बगे, रामचंद्र वाळोकार, पंढरी मांजरे, प्रल्हाद खंडारे, गजानन खंडारे, भास्कर अवटे, रामदास खंडारे, वासुदेव राखोंडे, श्यामराव बिल्लेवार, शेषराव ढोरे, गजानन पंडितकर, पुरुषोत्तम ढोरे, वसंता ढोरे, शंकर भालतिलक, रामेश्वर बदरखे, किसन काकड आदी शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची पेरणी केली; परंतु पाण्याअभावी पिके करपल्यामुळे उत्पादनात घट होत आहे. परिणामी, शेतकरी हवालदिल झाले असून, भुईमुगाच्या पिकाच्या अल्प उत्पादनाचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.
भुईमूग पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट!
By admin | Published: May 03, 2017 7:31 PM