अकोला : रिटर्न फाइल (विवरण) करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिलेले असताना, प्राप्तीकर खात्याच्या संकेत स्थळाची गती मंदावली आहे. त्यामुळे अनेक अडचणी येत असून, करदाते आणि कर सल्लागार त्रासले आहेत. ३१ आॅगस्टच्या आत जर आर्थिक वर्षाचे विवरणपत्र दाखल झाले नाही तर तांत्रिक बिघाडाचा आर्थिक फटका अनेकांना सोसावा लागणार आहे.केंद्र सरकारच्या प्राप्तीकर खात्याने विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढवून ३१ आॅगस्ट २०१८ केली. प्राप्तीकराचा भरणा अधिकाधिक व्हावा म्हणून विविध प्रयोग सुरू आहेत. विवरणपत्र दाखल न करणाऱ्यांना सेल्युलर मोबाइलवर पाच हजार रुपयांच्या दंडात्मक कारवाईचा इशारा दिला जात आहे. त्यामुळे करदाते करसल्लागार आणि विधिज्ञांकडे धाव घेत आहेत. एकीकडे करदात्यांची गर्दी वाढली असली तरी प्राप्तीकरच्या संकेतस्थळावर मात्र तांत्रिक बिघाड कायम आहे. गत पंधरवड्यापासून संकेतस्थळावर विवरण पत्र व्यवस्थित स्वीकारले जात नाही. एका अर्जदाराचे अर्ज तीन-चार वेळा अपलोड केल्याशिवाय सादर होत नाही. त्यामुळे करदाते, करसल्लागार आणि वकील वैतागले आहेत. संकेतस्थळाची गती मंदावली असल्याच्या तक्रारी पोर्टलवर नोंदविल्या आहेत. अकोला प्राप्तीकर विभागाचे संयुक्त आयुक्त अरविंद देसाई यांनीदेखील याबाबत वरिष्ठांकडे याबाबत कळविले आहे. ही समस्या सर्व्हरची असल्याने बंगरुळुहून यंत्रणा सरकवली जात आहे.