राजेश शेगाेकार
अकाेला : घड्याळाचा काटा जसजसा पुढे जाताे तसतसा काळ बदलताे...या बदलत्या काळाच्या पाेटात काय बदल दडला आहे हे कुठल्याच भविष्यवेत्यालाही सांगता येत नाही ... सन २०२० नव्या आकांक्षा नवे स्वप्न घेऊन सुरू झाले अन् अवघ्या तीन महिन्यांत या स्वप्नांना काेराेनाचा डंख बसला...काेराेना नावाच्या विषाणुने जगावे कसे हीच सर्वांची धडपड सुरू झाली... जगण्याच्या याच भीतीने धास्तीने सारा समाजाच अंतर्बाह्य बदलून गेला... संत महंतांना रुढी परंपरांचे अवडंबर, त्यावर हाेणारे खर्च टाळण्याचे प्रबाेधन केले, मात्र त्यांच्या वचनांची दखलही न घेणारा समाज काेराेनाच्या धास्तीने नव्या रुढी परंपरा आत्मसात करू लागला ...लग्न, अंत्यविधीच्या चाली बदलल्या... खर्चाची हौस, व्यसनांचा सोस संपला स्वच्छतेचे महत्त्व अंगी आले, स्वच्छ शुद्ध पर्यावरणाचे दर्शन घडले. नातेवाइकांची काळजी, घराघरांत संवाद वाढला, कुटुंब म्हणून सर्व एक झाले काेराेनामुळे समाजाची आर्थिक गाडी रुळावरून खाली आली यात वाद नाही. मात्र, साामाजिकस्तरावर अनेकांची बदलेली जीवनशैली आमूलाग्र बदलून गेली. कोरोना जसा खलनायक होऊन आला, तसा तो काही चांगल्या गोष्टीही शिकवून गेला.
नव्या शब्दांचे गारुड
‘कोरोना.. काॅन्टॅक्ट, ट्रेसिंग, स्वॅब, इन्क्युबेशन.. आयसोलेशन... लाॅकडाऊन... कन्टेनमेंट...आरटीपीसीआर, रॅपिड अँटिजेन.. असे नवे इंग्रजी शब्द खेड्यापाड्यातही अंगवळणी पडले..
माेकळा निर्सग अन् शुद्ध हवा
अकाेल्यातील प्रदूषित हवेमुळे एरव्ही बाराही महिने नाक-ताेंड झाकूनच घराबाहेर पडावे अशी स्थिती मात्र मार्च महिन्यातील कडक लाॅकडाऊनमुळे एप्रिल-मे महिन्याची हवाच बदलली कुठेही कचरा नाही, गाड्यांचा धुरळा नाही, आवाज नाही यामुळे पुन्हा एकदा पर्यावरणाचा महत्त्वाचा धडा मिळाला.
देव देव्हाऱ्यात नाही
परमेश्वर सर्वत्र आहे ही विचारधारा काेराेनामुळे प्रत्यक्षात आली. मंदिरे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा सारीच बंद होती. पण म्हणून काही देव नव्हता असे नाही. माणूसच देव बनला होता. लाॅकडाऊनमध्ये रोजगार गेलेल्या लोकांसाठी, रस्त्यावरच्या उपाशी जिवांसाठी जेवणाचे डबे घेऊन धावणारा माणूसच होता. अनेक लाेक अन्नदाते बनली. प्रार्थनेसाठी जुळणाऱ्या दोन हातांपेक्षा मदतीसाठी सरसावणारा एक हात मोलाचा असतो, हे सिद्ध झाले. ते माणसांनीच तर सिद्ध केले !
यात्रा थांबल्या लग्न साधेपणाने तेरवी नाहीच
कोरोनामुळे यात्रा थांबल्याच लग्नांवर बंधने आली, माेजक्याच आप्तस्वकीयांच्या उपस्थित अंत्यसंस्कार झाले अन् तेरवीही घरातच झाल्या. साध्या बारशालाही कोणाला बोलावण्याची सोय उरली नाही. पण म्हणून माणुसकी संपली असे नाही. हे सर्व थांबविताना प्रत्येकाच्या जिवाची काळजी घेण्याची धडपड यामध्ये दिसून आली.
कावड यात्रा, गणेशाेत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन
अकाेल्यातील लाेकाेत्सव असलेल्या कावड यात्रेचेही राजकारण रंगले, मात्र भक्तांनी संयम ठेवला श्रद्धा पाळल्या गेली अन् काेराेनाचे नियमही गणेशाेत्सव, दुर्गात्सवाचा उत्साहही बंदिस्त झाला. धम्मचक्र प्रवर्तन दिनातील प्रबाेधनाचे माणिक ऑनलाइन दिल्या गेले अन् इद, नाताळही काेराेनाच्या नियमातच झाली, मात्र या सर्व उत्सवातही भक्तिभाव कायमच राहिला.
स्वावलंबनाचे धडे
लाॅकडाऊनमुळे यंदा अनेकांनी स्वत:ची कामे स्वत: करण्यावर भर दिला. अनेकांनी तर अक्षरश: स्वत:ची दाढी-कटिंगही स्वत:च केली. मुलांचा अभ्यास पालकांनीच घेतला, अनेक स्वंयपाकघरात कर्तेपुरुष हातभार लावताना दिसले वैयक्तिक स्वच्छतेसह परिसरातील स्वच्छतेवरही भर दिला गेला स्वच्छतेचे महत्त्व अंगी बाणविणारे आगळेवेगळे वर्ष ठरले दिवसांतून दोनदा अंघोळ करणे, दहादा हात धुणे या सवयी आपण जडवून घेतल्या.
चैनीला फाटा, गरजेला मोल
काेराेनामुळे राेजगारच ठप्प झाला हाेता त्यामुळे पैशाची उधळपट्टी टाळणे आणि बचत वाढविणे याकडे अनेकांचा कल वाढला. गाड्या, टीव्ही व अशाच अन्य चैनीच्या वस्तूंपेक्षा अन्न-औषधांसाठी चार पैसे गाठीला असावे, असा प्रत्येकाचा प्रयत्न वाढला आहे. लाॅकडाऊनमध्येच दारू, खर्रा आदी व्यसनांची दुकानेच बंद होती. त्यामुळे व्यसनांवरील खर्चही काहीकाळ का होईना कमी झाला.