जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात वेब पोर्टल व मोबाइल ॲपचे अनावरण करण्यात आले.
कोविड-१९ अकोला या वेब पोर्टलवर जिल्ह्यातील नागरिकांना कोविड रुग्णालयाची, तसेच रुग्णालयातील जनरल वाॅर्डातील बेड, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेड उपलब्धतेबाबत माहिती दर्शविण्यात येणार आहे. ही माहिती रोज अपडेट होणार आहे, तसेच स्वस्त औषध स्थिती दर्शविणारे जेनरिक आर्क मोबाइल ॲपद्वारे आवश्यक औषधींची मागणी, डॉक्टरांची अपॉइंटमेंट, चाचणी सेंटर व इतर माहिती प्राप्त होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी यावेळी दिली. या वेब पोर्टल व मोबाइल ॲपचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी केले.
------------------------------------
कोविड लसीकरणासाठी नोंदणी पंधरवडा राबवा
अकोला : वय वर्षे १८ ये ४४ वयोगटातील व्यक्तींना कोविडचे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरिता कोविन ॲप किंवा आरोग्य सेतूच्या माध्यमातून लसीकरण नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विशेष करून ग्रामीण भागात लसीकरण नोंदणीकरिता पंधरवडा मोहीम राबविण्याचे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यात आता ग्रामीण भागातही कोविड संसर्गाचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. तेव्हा ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष द्या, अशा सूचनाही कडू यांनी यावेळी प्रशासनास केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात कोविड-१९ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, तसेच प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सूचना दिल्या की, लसीकरण करण्याकरिता जास्तीत जास्त नोंदणी व्हावी याकरिता जनजागृती अभियान राबवावे. विशेष करून ग्रामीण भागात नोंदणी करण्याकरिता प्रोत्साहित करावे. याकरिता त्याच्या मदतीला ग्रामसेवक, तलाठी, कोतवाल व कृषी सेवकांच्या साहाय्याने ग्रामस्तरावर नोंदणी पंधरवडा मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. अशा पद्धतीने नोंदणी करून नंतर दिलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण झाल्यास लसीकरण केंद्रांवर गर्दी होणार नाही. त्यासाठी ग्रामीण भागातील लोकांची विशेषतः जे लोक मोबाइल, स्मार्ट फोनवरून नोंदणी करू शकत नाहीत, अशा लोकांची नोंदणी करून घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
.................
मंगल कार्यालयांवर वाॅच ठेवा
अकाेला : कोविड-१९ चा फैलाव आता ग्रामीण भागात जादा होताना दिसत आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपायोजना अधिक कडक कराव्यात. लग्न समारंभाकरिता देण्यात आलेल्या अटी-शर्तीचे पालन होत नसल्यास संबंधित व्यक्ती व मंगलकार्यालय चालकांवर कडक कारवाई करा, असे निर्देश बच्चू कडू यांनी पोलीस यंत्रणेस दिले. जिल्ह्यातील ऑक्सिजन उपलब्धेबाबत आढावा घेऊन ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीनुसार ऑक्सिजन निर्मितीकरिता नियोजन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेस दिले, तसेच कोरोना रुग्णास चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णालयाच्या ठिकाणी स्वच्छता व जेवणाची व्यवस्था उत्तम राहील यांची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
........................