अकोला : शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीच्यावतीने महा कृषी ऊर्जा अभियानअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौरकृषी पंप देण्याचे धोरण आहे. या धोरणाचा प्रारंभ मंगळवारी करण्यात आला आहे. याच अभियानअंतर्गत शेतकरी प्रकाश तायडे चिखलगाव, सुधाकर वाहूरवाघ (साहित-अकोला), शंकर पालवे (पोपटखेड), योगेश केसळे (मूर्तिजापूर) आणि मदन पांडे (निंभी बार्शिटाकळी) अशा पाच शेतकऱ्यांना सौरकृषी पंप कोटेशनचे वाटप करण्यात आले.
विद्युत भवन, अकोला येथे महा कृषी ऊर्जा अभियानाच्या कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला महावितरण, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह शेतकरी बांधव व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी या अभियानाअंतर्गत पालकमंत्र्यांच्या हस्ते पाच लाभार्थ्यांना सौर कृषिपंप योजनेचे कोटेशन वाटप करण्यात आले.
'कृषिपंप वीज जोडणी धोरण - २०२०' राबविण्यात येत असून, या धोरणात अनधिकृत वीज जोडण्या अधिकृत करणे, तत्काळ नवीन वीज जोडणी देणे, तसेच कृषिपंपाच्या थकबाकीवर ६७ टक्क्यांपर्यंत माफी देऊन वसूल झालेल्या वीज बिलाच्या ६६ टक्के रक्कम ही त्या जिल्ह्याची वीज यंत्रणा सक्षमीकरणाकरिता वापरण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पेठकर यांनी केले. दरम्यान, अकोला तालुक्यातील (पांढरी खरप) येथील अंध शेतकरी केशराव भीमराव गायकवाड यांना वीज जोडणी देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल अकोला ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. पी. केनेकर यांचा पालकमंत्री ना. कडू यांनी सन्मान केला.