अकोला: जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या संकल्पनेनुसार ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा क्रांतीदिनी शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद आगरकर विद्यालयातून शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांच्या हस्ते ‘एक विद्यार्थी-एक वृक्ष’ मोहिमेचा शुभारंग करण्यात आला.माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे उपस्थित होते. यासोबतच प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग, शिक्षण समन्वयक प्रकाश अंधारे, मुख्याध्यापक संघाचे विदर्भ अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, आगरकर विद्यालयाचे प्राचार्य वाल्मीक भगत, माजी जि.प. सदस्य प्रतिभा अवचार व भाजपचे जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात उपस्थित होते. यावेळी ना. अॅड. संजय धोत्रे यांनी आगरकर विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण केले. यासोबतच मान्यवरांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना लागवड करण्यासाठी वृक्ष दिले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते परिसरात शेकडो वृक्षांची लागवड करण्यात आली. माध्यमिक शिक्षण विभागाला यंदा १ लाख ८४ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे सर्व शाळांनी दिलेल्या वृक्षांची प्रामाणिकपणे लागवड करून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहनही केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अॅड. संजय धोत्रे यांनी केले. (प्रतिनिधी)