अकोला: जिल्हय़ासह शहरामध्ये गल्लीबोळातील गुंडांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दररोज घरफोड्या, चोर्या, हाणामारी, लुटमारीच्या घटना घडत आहेत. पोलिस केवळ गुन्हा दाखल करण्यापुरतेच उरले आहेत. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुंड, चोरट्यांचे मनोबल वाढले. दररोजच्या घडणार्या गंभीर गुन्हय़ांमुळे जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था केवळ नावालाच असल्याचा आरोप आता नागरिकांकडून होऊ लागला आहे. जिल्हय़ातील बाळापूर तालुक्यातील काही गावांमध्ये चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. गावातील नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. पोलिसांचे काम नागरिकांना करावे लागत असल्याची स्थिती निर्माण झाली. चोरी, घरफोडी झाली की, पोलिस घटनास्थळावर पोहोचून पंचनामा करतात. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करतात. गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरणाचा तपास सहा महिनेच काय वर्षभरानंतरही सुरू असतो. तक्रारकर्ता पोलिस ठाण्याच्या चकरा मारून थकून जातो; परंतु त्याला न्याय मिळत नाही. त्याचा चोरीस गेलेला माल परत नाही. त्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत आहे. चोरी, घरफोडी, फसवणूक झाली, खंडणी मागितली तरी पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला जात नाही. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही वर्षांपासून मुली, महिलांना पळवून नेण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. गुंडगिरीचे प्रमाण एवढे प्रचंड वाढले आहे की, गुंडगिरीला आवर कसा घालावा, याचे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे. खून, दरोडा, लुटमार, अपहरण, बलात्कार, छेडखानीसारख्या गंभीर गुन्हय़ांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून गुंडांकडून व्यावसायिक, बिल्डर, नागरिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यानी गुन्हा कोणताही घडो, सर्वप्रथम नागरिकांनी पोलिसात तक्रार देण्याचे अवाहन केले. पोलिसांना माहिती द्यावी. तक्रार दिल्यानंतर पोलिस कारवाई करून गुंडांना अटक करतात. चोरी, घरफोडीचे गुन्हे सातत्याने उघडकीस येत आहेत. नागरिकांनी पोलिसांना दोष देण्याऐवजी त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे गुन्हेगारी वाढत आहे, कायदा व सुव्यवस्था ढासळली हे म्हणणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी नोंदविले.
अकोला जिल्हय़ात कायदा व सुव्यवस्था ढासळली
By admin | Published: July 03, 2014 1:22 AM