अकोला : राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) देशात गतीने वाढत असून, एनसीसी प्रशिक्षण घेण्याकडे अलिकडे मुलींचाही ओढा वाढला आहे. हे चांगले संकेत असून, भविष्यात हे प्रमाण आणखी वाढेल, असा विश्वास महाराष्ट्र एनसीसीचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल सुबोध कुमार यांनी खास लोकमतशी बोलताना व्यक्त केला.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांना मानद कर्नल कमाडंटं पदवी बहाल करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सुबोध कुमार अकोल्याला आले असताना त्यांनी लोकमतशी चर्चा केली.
प्रश्न- एनसीसीच्या माध्यमातून सैन्यदल, नौदल व हवाई दलात नोकरीच्या संधी आहेत का ?- राष्ट्रीय छात्र सेना राष्ट्र निमिर्तीसाठी बांधील आहे. राष्ट्रप्रेम तसेच देशसेवेची जबाबदारी विद्यार्थी दशेपासूनच आपल्यावर असते, याची जाणिव कॅडेटस्मध्ये निर्माण केली जाते. या माध्यमातून अनेक कॅडेटस् या तिन्ही दलांमध्ये सेवा देत आहेत.
प्रश्न- या तिन्ही दलात भरती होण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण किती आहे ?- महाराष्ट्रात एनसीसीला चांगला प्रतिसाद आहे. मुलांसोबतच मुलींचेसुध्दा एनसीसीमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण वाढले आहे; परंतु या तिन्ही दलांमध्ये भरती होण्याचे महाराष्ट्राचे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.
प्रश्न- एनसीसी कॅडेटस्ना या तिन्ही दलात भरतीसाठी काही सवलती आहेत का?- होय, कॅडेटस् शारीरीकदृष्ट्या सक्षम असेल तर त्यांना लेखी परीक्षेमध्ये काही अंशी सूट दिली जाते. एनसीसीचा अभ्यासक्रम अद्ययावत करण्यावरही भर दिला जात आहे.
प्रश्न- राज्यात एनसीसीचा विस्तार कुठे-कुठे होत आहे ?- राज्यात एनसीसीचा विस्तार जलद गतीने होत असून, वाशिम जिल्हा झाल्यापासून येथे स्वतंत्र एनसीसी बटालियन नसल्याने, या जिल्हयाला एक नवी बटालियन उभारण्यात येत आहे.
प्रश्न- मानद कर्नल पदवी किती मान्यवरांना दिली ?- एनसीसीचे कॅडेट असलेले व देशसेवेची प्रेरणा निर्माण करणार्या अनेकांना ही पदवी देण्यात आली आहे. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदेश मंत्री सुषमा स्वराज, जया बच्चन, उद्योगपती आदी गोदरेज हे सर्व मान्यवर एनसीसीचे कॅडेटस् राहिलेले आहेत. त्यांनाही मानद कर्नल पदवी बहाल करण्यात आली आहे. डॉ. दाणी कॅडेट होते, त्यांनाही पदवी प्रदान करण्यात आली आहे.