संतोषकुमार गवई
पातूर : गेल्या ६४ वर्षांपूर्वी येथील पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली होती. सद्य:स्थितीत इमारत जुनी झाली असून, इमारतीच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे पावसाळ्यात कर्मचाऱ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पंचायत समिती कार्यालयाची इमारत जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात सापडला आहे.
पातूर येथील पंचायत समितीची इमारत दि. १ एप्रिल १९५४ रोजी बांधण्यात आल्याचे पंचायत समितीच्या इमारतीच्या दर्शनी भागावर नमूद करण्यात आले आहे. इमारतीला तब्बल ६४ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंचायत समितीच्या भिंतीला तडे गेले असून, इमारतीच्या छताला गळती लागली आहे. या इमारतीत ३० पेक्षा जास्त कर्मचारी विविध विभागांमध्ये काम करतात. इमारतीचा व्हरांडा भागात छताला गळती लागली आहे. पावसाचे पाणी येत असल्याने कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. इमारतीच्या भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. पाणीटंचाई निवारण कक्ष आणि पंचायत विस्ताराधिकारी कक्ष, स्वच्छता मिशन, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार अभियान कक्ष, त्याबरोबरच सभापती कक्ष, वित्तलेखा शाखा, पंचायत कक्ष, उपसभापती कक्ष आदी ठिकाणी इमारतीच्या छतामधून पावसाचे पाणी गळत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी शासनाकडे नवीन इमारत बांधकामाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता तो मंजूरही झाला होता. दोन वर्षांचा कालावधी उलटून गेला, मात्र अद्यापही इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली नाही. प्राप्त माहितीनुसार, सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे; मात्र तो अद्यापही शासन दरबारी धूळ खात पडला, असल्याची माहिती आहे.
------------------------------------
कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
पंचायत समितीची इमारत जीर्ण झाली असून, भिंतीला तडे गेले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात इमारत कोसळण्याची भीती कर्मचाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचारी भीतीच्या वातावरणात काम करीत असल्याचे चित्र आहे.
-------------------
कॉम्प्युटरच्या संरक्षणासाठी ताडपत्री
पातूर पंचायत समितीच्या इमारतीच्या छतातून गळतीमुळे येथे काम करणारे कर्मचारी धास्तावले आहेत. पंचायत समितीच्या आवारातील गटसाधन केंद्राच्या इमारतीलाही तडे गेले आहेत. जीवन्नोती अभियान बांधकाम विभाग कार्यरत असलेल्या कक्षाच्या छतालाही गळती लागली आहे. कर्मचारी काम करीत असताना तांत्रिक उपकरणे, कॉम्प्युटर आदींचा बचाव करण्यासाठी ताडपत्रीचा साहारा घेत असल्याचे दिसून येत आहेत.
200821\img_20210820_160840.jpg
पंचायत समितीच्या इमारतीच्या स्लॅब ला गळती