अकोला- पुष्पगुच्छांची शोभा वाढविणार्या जरबेरासारख्या फुलांचे पीक विदर्भातील उष्ण वातावरणातही घेता येऊ शकते, यावर संशोधन करणारी अकोलेकर कन्या डॉ. श्रुती वानखेडे यांच्या संशोधनाची दखल र्जमनीने घेतली आहे. त्यांनी जरबेराच्या १३ जातींवर केलेल्या संशोधनावर र्जमनीतील लॅबर्ट प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केले असून, त्याला आंतरराष्ट्रीय पुस्तक मानांकनही मिळाले आहे. अकोला जिल्ह्यातील कुरुम येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. श्रुती वानखेडे या औरंगाबाद येथील शाहू महाराज कृषी महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका आहेत. या अकोलेकर कन्येने स्नातकोत्तर पदवीकरिता ह्यजरबेराह्ण हा विषय निवडला होता. नागपूर येथील सातुपडा बॉटनिकल गार्डनमध्ये त्यांनी या विषयावर संशोधन केले. विदर्भासारख्या उष्ण हवामान असलेल्या प्रदेशात जरबेरासारख्या नाजूक फुलांचे पीक घेता येऊ शकते, हे त्यांनी संशोधनातून सिद्ध केले. त्यासाठी जरबेराच्या वेगवेगळ्य़ा १३ जातींची त्यांनी निवड केली. शेडनेटच्या मदतीने फुलांचे पीक मोठय़ा प्रमाणावर घेऊ शकतो, हे त्यांनी सखोल अभ्यास करून त्यांच्या संशोधनात मांडले आहे. या संशोधनादरम्यान त्यांनी सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली. विदर्भाच्या मातीत विविध प्रजातींची पिके कशाप्रकारे घेतली जाऊ शकतात, याची काटेकोर तपासणी केली. शेडनेटमध्ये जरबेराचे पीक घेताना कोणत्या प्रजातीची निवड करावी, यावर त्यांनी संशोधन केले. त्यांच्या या संशोधन प्रबंधाची दखल र्जमनीतील लॅबर्ट प्रकाशनाने घेऊन त्यावर पुस्तक प्रकाशित केले. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातून अशाप्रकारे संशोधन करणार्या त्या पहिल्याच संशोधक ठरल्या आहेत. जरबेरा हे पीक शेतकर्यांसाठी वरदान ठरणारे आहे. विदर्भात शेडनेटच्या माध्यमातून ही फूलशेती केल्यास त्यातून आर्थिक संपन्नता मिळू शकते. त्यामुळे या फुलांच्या शेतीबाबत संशोधन केले. त्यावरील प्रबंधाची दखल र्जमनीतील प्रकाशनाने घेतली. ही केवळ माझ्यासाठीच नाही तर संपूर्ण विदर्भासाठी अभियानाची बाब असल्याचे डॉ. श्रुती वानखेडे यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.
अकोलेकर कन्येच्या ‘जरबेरा’ची र्जमनीपर्यंत झेप
By admin | Published: December 08, 2014 11:35 PM