आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांंना आता ई-लर्निंंग प्रणालीद्वारे शिक्षणाचे धडे दिल्या जाणार आहेत. प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिकविल्या जाणार्या ई-लर्निंंगसाठी शासनाकडून मोठय़ा प्रमाणात निधीची तरतूद केली जाते. महापालिका आयुक्त अजय लहाने, उपायुक्त समाधान सोळंके यांच्या पाठपुराव्यामुळे मनपाच्या इतिहासात पहिल्यांदाच ई-लर्निंंगसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असून, मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आली आहे.महापालिका, जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणार्या चिमुकल्या विद्यार्थ्यांंमध्ये अभ्यासाप्रती आवड निर्माण व्हावी, यासाठी नावीन्यपूर्ण शिक्षण प्रणाली आत्मसात करण्याच्या दिशेने शासनाची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थ्यांंना शिकविल्या जाणारे पाढे, बाराखडी, कविता सुरात न म्हणता प्रोजेक्टरद्वारे चलचित्राच्या माध्यमातून दाखविल्यास विद्यार्थ्यांंच्या स्मरणात राहतील, असा शिक्षण विभागाचा दावा आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंंग प्रणालीद्वारे शिक्षणाचे धडे देण्याकरिता शासनाने निधीची तरतूद केली. स्वायत्त संस्थांना जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करून दिला जातो. यापूर्वीसुद्धा हा निधी उपलब्ध होत असला, तरी मनपाच्या शिक्षण विभागाने आजपर्यंंत जिल्हा नियोजन समितीकडे निधीसाठी मागणीच केली नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली. ही बाब ध्यानात घेऊन महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी नियोजन समितीकडे ई-लर्निंंगसाठी निधीची मागणी केली असता समितीने ३५ लाखांपेक्षा अधिक रक्कम मंजूर केल्याची माहिती आहे. हा निधी प्राप्त होताच मनपा प्रशासनाने प्रोजेक्टर, डिजिटल ब्लॅकबोर्ड व इतर तांत्रिक साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली. प्रशासनाकडे दोन निविदा प्राप्त झाल्या असून, दोन्ही कंपन्यांनी कमी दरानुसार निविदा सादर केली आहे. साहित्य खरेदीची रक्कम लक्षात घेऊन दोन्ही निविदा स्थायी समितीकडे सादर करण्यात आल्या आहेत.
शिक्षकांना देणार प्रशिक्षण!मनपाच्या विद्यार्थ्यांंंना प्रोजेक्टरच्या माध्यमातून डिजिटल ब्लॅकबोर्डवर ई-लर्निंंगचे धडे दिल्या जातील. चिमुकल्या विद्यार्थ्यांंंमध्ये आवड निर्माण व्हावी, यासाठी चलचित्राच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकविण्यात येईल. यासाठी महापालिकेच्या शिक्षकांना कंपनीमार्फत प्रशिक्षण दिले जाईल.
मनपाकडून ब्रँडेड साहित्याची मागणीई-लर्निंंंग प्रणालीसाठी तकलादू साहित्य खरेदी करण्याला फाटा देत महापालिकेने संबंधित कंपन्यांना ब्रँडेड साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. जेणेकरून साहित्याचा दर्जा टिकून विद्यार्थ्यांंंना कायमस्वरूपी या शिक्षणाचा लाभ देण्यात येईल.
मनपाच्या विद्यार्थ्यांंंना ई-लर्निंंंग प्रणालीद्वारे शिक्षणाचे धडे दिले जातील. खासगी शाळांप्रमाणेच आता मनपा शाळेतही आधुनिक पद्धतीने शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. साहित्य खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. -अजय लहाने, आयुक्त मनपा.