अकोला : रॅपिड अॅन्टिजन टेस्टचा अहवाल निगेटिव्ह आल्याने मूर्तिजापूर येथील एका रुग्णाला सुटी देण्यात आली होती; मात्र त्याची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबीयांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र दुसºयाच दिवशी आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे सर्वोपचार रुग्णालयातून समजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून चाचण्यांवर संशय व्यक्त केला जात आहे.मूर्तिजापूर तालुक्यातील उनखेड गावातील ३० वर्षीय युवकाला ताप आल्याने त्याला ५ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाला कोरोनाची लक्षणे असल्याने कोरोना चाचणीसाठी डॉक्टरांनी त्याचे नमुने घेतले; परंतु रुग्णाची प्रकृती पाहता डॉक्टरांनी गुरुवार ६ जुलै रोजी त्याची रॅपिड अॅन्टिजन टेस्टदेखील केली. यामध्ये त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला सामान्य वॉर्ड क्रमांक ९ मध्ये हलविण्यात आले; मात्र प्रकृती सुधारत नसल्याने नातेवाइकांनी त्याला सिव्हिल लाइन चौकातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र या ठिकाणी उपचारादरम्यान तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती रुग्णाच्या गावातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मिळाली. त्यामुळे रुग्णासह त्याच्या नातेवाइकांना चांगलाच धक्का बसला. एक दिवसापूर्वीच रुग्ण निगेटिव्ह असताना दुसºया दिवशी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे सांगण्यात आले. रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल हा आरटीपीसीआर चाचणीचा आहे.
निगेटिव्ह म्हणून रुग्णाला सुटी; दुसऱ्याच दिवशी पॉझिटिव्ह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 10:29 AM