अकोला: महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे उभारण्यासाठी शासनाने ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. कंपनीसोबत पथदिव्यांची उभारणी व सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचा करार केल्यानंतर महापालिकेला चौदाव्या वित्त आयोगातून १९ कोटी रुपयांचे देयक अदा करावे लागणार आहे. मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्यासमोर हा करार ठेवण्यात आला असता, त्यांनी अवलोक न करून त्यामध्ये त्रुटी काढल्याची माहिती आहे. सदर त्रुटी दूर केल्यानंतर कराराचा मार्ग मोकळा होणार आहे.महापालिका क्षेत्रात ईईएसएल कंपनीच्या माध्यमातून पथदिवे उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. मनपा क्षेत्रातील पथदिव्यांची एकूण संख्या, त्यावर खर्च होणारी वीज व त्या बदल्यात मनपाला प्राप्त होणारे वीज देयक आदी मुद्दे लक्षात घेता कंपनीसोबत करार करण्यात आला. प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडून तसा ठराव मंजूर क रून घेत अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर केला होता. पहिल्या करारानुसार पथदिव्यांची उभारणी करणे व पुढील सात वर्षांच्या देखभाल दुरुस्तीपोटी महापालिकेला ३७ कोटींचे देयक अदा करावे लागणार होते. त्यामध्ये शासनाच्या आर्थिक मदतीचा समावेश होता. यादरम्यान, वीज बचतीचा प्रयोग अकोला मनपा क्षेत्रात यशस्वी होणार नसल्याची बाब समोर आल्यामुळे कंपनीसोबत करण्यात आलेला पहिला करार रद्द करून मनपा प्रशासनाने सभागृहात नवीन प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला सत्तापक्षाने मंजुरी दिली होती.आयुक्तांच्या मंजुरीनंतर मार्ग मोकळा!‘ईईएसएल’ कंपनीसोबत सात वर्षांचा करार केला जाणार आहे. सत्तापक्षाकडून प्राप्त कराराच्या ठरावाचे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी अवलोकन केल्याची माहिती आहे. शिवाय, तयार करण्यात आलेल्या ‘ड्राफ्ट’मध्ये काही त्रुटी काढल्याने ती पूर्ण करून करार सादर करण्याचे आयुक्तांचे निर्देश आहेत. आयुक्त कापडणीस यांच्या मंजुरीनंतर येत्या तीन-चार दिवसांत एलईडी पथदिव्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.सात वर्षे देखभाल दुरुस्ती कंपनीकडे!‘ईईएसएल’ कंपनीसोबत करण्यात आलेल्या पहिल्या कराराची किंमत ३७ कोटी होती. ही रक्कम जास्त असल्याने शासनाच्या सुधारित निर्देशानुसार मनपाला १३ कोटी ९० लाख रुपये व देखभाल दुरुस्तीपोटी सहा कोटी असे एकूण १९ कोटी ९० लाख रुपये एकरकमी अदा करावे लागतील.