अकोला: शहरात ‘एलईडी’ पथदिवे उभारणाºया रॉयल कंपनीचा भोंगळ कारभार अकोलेकरांच्या जीवावर उठल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला. जुने शहरातील डाबकी रोड परिसरात मुरली स्वीटमार्टच्या समोर उभारलेल्या पथदिव्याची वायर थेट रस्त्यावर पडल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाला धोका असल्याची बाब वेळीच लक्षात आली. भाजपचे कार्यकर्ते नीलेश निनोरे यांनी यासंदर्भात मनपाच्या विद्युत विभागाला सूचना दिल्यानंतर धावपळ करीत मनपाने ही वायर ताब्यात घेतली. यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे दिसून आले.शहरात एलईडी पथदिवे उभारण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने १० कोटींचा निधी दिला. यामध्ये मनपाने चौदाव्या वित्त आयोगातून १० कोटी रुपये जमा करीत एकूण २० कोटी रुपयांतून एलईडी पथदिवे उभारण्याची निविदा प्रसिद्ध केली. रॉयल इलेक्ट्रॉनिक कंपनी (पुणे)कडून पथदिवे लावण्याचे काम करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील मुख्य ५० रस्त्यांसह ११० प्रमुख चौकांचा समावेश आहे. एकीकडे एलईडीच्या लख्ख उजेडाचे कौतुक केले जात असले तरी दुसरीकडे मागील सहा महिन्यांच्या कालावधीत रॉयल कंपनीने उभारलेल्या पथदिव्यांची यंत्रणा पूर्णत: कोलमडल्याची परिस्थिती आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, डाबकी रोडवरील मुरली स्वीटमार्टच्या बाजूला रस्त्यालगत उभारलेल्या एलईडी पथदिव्याच्या खांबावरील विद्युत प्रवाह असलेली वायर रस्त्यावर पडल्याचा प्रकार घडला. यामधून धूर निघत असल्याचे वेळीच लक्षात येताच भाजप कार्यकर्ते नीलेश निनोरे यांनी तातडीने मनपाच्या विद्युत विभागाला सूचना केली. या ठिकाणी पावसामुळे सर्वत्र चिखल साचला होता. पाण्यात विद्युत प्रवाह संचारला असता तर मोठी दुर्घटना होण्याची चिन्हे होती. विद्युत विभागानेसुद्धा तातडीने दखल घेत कर्मचाऱ्यांना पाठवून या वायरचा विद्युत पुरवठा खंडित केला.सोशल मीडियावर क्लिप व्हायरल!रस्त्यालगतच्या विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह असल्याची जाणीव नसल्यामुळे एका तरुणीने अजानतेपणाने विद्युत खांबाला स्पर्श केल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. पावसाळ्यात विद्युत खांबांना हात न लावण्याचे आवाहन त्यामध्ये करण्यात आले असतानाच डाबकी रोडवर घडलेल्या प्रकारामुळे संबंधित दुर्दैवी घटनेची दिवसभर चर्चा रंगली होती.