अकोला, दि. २४- जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार एलईडी टीव्ही खरेदी करण्याचे आमिष दाखवून येथील निशांत सेल्सच्या एका सेल्समनकडील ३६ हजार रुपये रोख व सोन्याची अंगठी अज्ञात ठगाने लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघड झाली. निशांत सेल्स येथील सेल्समन किरण प्रतापराव अंधारे यांच्याकडे सोमवारी दुपारी नदीम नामक व्यक्ती गेला. त्यानंतर नदीमने अंधारे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये चार एलईडी लावायचे असून ते निशांत सेल्स येथूनच खरेदी करणार असल्याचे सांगितले; मात्र त्यासाठी अंधारे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावे लागणार असल्याचे सांगितले. सदर इसमाने अंधारे यांना विश्वासात घेतल्याने अंधारेही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. त्यानंतर नदीम नामक व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कक्षाच्या आतमध्ये जाऊन काही वेळात परत आला. त्याने अंधारे यांना एक हजार रुपयांच्या नोटा असलेले एक लाख रुपये देणार असल्याचे सांगितले; मात्र एलईडी टीव्ही ८४ हजार रुपयांच्या होणार असल्याने अंधारे यांना १६ हजार परत मागितले अंधारे यांनी त्याला १६ हजार दिले त्यानंतर आणखी २0 हजार रुपये दिले. एवढेच नव्हे तर हाताच्या बोटातील सोन्याची अंगठीही या ठगाने काढून घेतली. अंधारे यांनी त्याला रोख ३६ हजार आणि ७ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली व तो ज्या कक्षात गेला त्या कक्षाच्या बाहेर बसले. बराच वेळ झाला तरी या ठगबाज परत न आल्याने त्यांनी कक्षात जाऊन चौकशी केली असता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असा एकही व्यक्ती नसल्याचे त्यांना कळले. त्यानंतर अंधारे यांना फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली. सिटी कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
एलईडी टीव्ही खरेदीच्या नावाखाली ठगविले!
By admin | Published: October 25, 2016 3:01 AM