- राजेश शेगाेकार
अकाेला : अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागेल. यावेळी ही निवडणूक अतिशय चुरशीची झाल्याची चर्चा आहे, त्यामुळे निकाल काय लागणार, याची उत्कंठा पश्चिम वऱ्हाडाला आहे. महाविकास आघाडी व भाजप अशी काट्याची लढत झाली असून, निकाल काेणाच्याही बाजूने लागला, तरी ताे या मतदारसंघासाठी नव्या विक्रमाची नाेंद करणारा ठरणार आहे. हा मतदारसंघ १९८८ पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात आहे, ताे आताही कायम राहिला, तर शिवसेनेचा पाचवा तर उमेदवार गाेपीकिशन बाजाेरिया यांचा चौथा विजय ठरेल. बाजाेरिया व शिवसेना यांचा सलग विजयाच्या नव्या विक्रमाची नाेंद हाेईल. जर भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विजयाचे कमळ फुलविले, तर या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलविण्याचे, तसेच बाजाेरिया यांच्यासारख्या दिग्गजाला पराभूत करण्याच्या विक्रमाची नाेंद हाेईल.
अकाेला, वाशीम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात गत चारही निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्रित हाेती. यावेळी मात्र युती दुभंगली असल्याने, भाजपने ताेडीस ताेड उमेदवार देऊन मतदारसंघात चुरस वाढविली हाेती. अकाेला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांत विखुरलेल्या या मतदारसंघांत शिवसेनेकडे कधीही मतदारांचं बहुमत राहिलेले नाही, तरीही विद्यमान आमदार गाेपीकिशन बाजाेरीया यांनी विजयाचा ‘चमत्कार’ घडवून आला. या पृष्ठभूमीवर यावेळी मात्र त्यांची चांगलीच दमछाक झाल्याची चर्चा तर भाजपचे खंडेलवाल यांनी ही निवडणूक अतिशय शांतपणे अन् मुत्सद्दीगिरीने लढल्याची चर्चा आहे. शेवटच्या दिवसापर्यंत दाेन्ही उमेदवारांनी आपल्या पत्त्यातील ‘अर्थ’ मतदारांना सांगितला नसल्याने, ऐन वेळी डाव मांडून फितुरी टाळल्याचेही बाेललेे जाते, त्यामुळे विजयाचे पारडे काेणाकडे झुकले याची चर्चा आता रंगत आहे.
वंचितचा कल काेणाकडे झुकला
वंचित बहुजन आघाडीने दाेनपैकी एकाही उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिला नव्हता. मतदारांनी आपल्या सदसदविवेक बुद्धीनुसार मतदान करावे, असे आदेश वंचितच्या नेतृत्वाने दिले हाेते. त्यामुळे वंचितचा काैल काेणाकडे झुकला, हा प्रश्नच आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या दरम्यानच अकाेला जिल्हा परिषदेमध्ये एक घडामाेड झाली, जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात यावी, अशा मागणीचे पत्र वंचित सत्तापक्ष वगळता विरोधी गटाच्या २९ सदस्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे सादर केले होते. त्या पत्रावर जिल्हा परिषदेतील भाजपच्या पाच सदस्यांच्याही स्वाक्षऱ्या होत्या, परंतु त्या पत्रावरील आमच्या स्वाक्षऱ्या ग्राह्य धरण्यात येऊ नये, असे पत्र भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या वतीने अध्यक्षांना देण्यात आले. ही घडामाेड पाहता, वंचितचा कल भाजपकडे झुकला असावा, अशी चर्चा आहे. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र या चर्चेला दुजाेरा दिला नाही.
महाविकास आघाडीतील धुसफूसचे काय झाले?
महाविकास आघाडीतील घटक पक्षातच कायम धुसफूस आहे. काँग्रेसने स्वबळाचा नारा देत, या आधीच स्थानिक स्तरावर वेगळी चूल मांडली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी आणी शिवसेनेत मैत्रीचे ऋणानुबंध घट्ट हाेत असतानाच, शिवसेनेतच अंतर्गत गटबाजी चांगलीच जाेर धरत आहे. या गटबाजीला मतदानापुरते शमविण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले की, कायम राहून काही दगाफटका झाला, याचाही निकालावर परिणाम हाेणार आहे.
असे हाेते मतदार
भाजप २४६
काँग्रेस १९१
शिवसेना १२४
राष्ट्रवादी ९१
वंचित ८६
एमआयएम ७
अपक्ष व इतर आघाडी ७७