अकाेला : शेतकऱ्यांच्या भाेवती लागलेला सावकारीचा फास साेडविण्यासाठी सरकारने सावकारविराेधी कायदा आणला; मात्र या कायद्यामधील त्रुटींवर बाेट ठेवून प्रशासकीय अधिकाऱ्यांनीच सावकारांना हाताशी घेत शेतकऱ्यांची लूट सुरू केली आहे. या लुटीला शिवसेनेच्या एका नेत्यासह काही राजकीय नेत्यांचे पाठबळ आहे, असा आराेप माजी राज्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे यांनी केला तसेच या सावकारी विराेधात लवकरच आता आंदाेलन उभारणार असल्याचीही घाेषणाही त्यांनी केली. स्थानिक एका हाॅटेलमध्ये रविवारी आयाेजित पत्रकार परिषदेत गावंडे यांनी सावकारी विराेधात एल्गार पुकारण्याची घाेषणा केली. ते म्हणाले, सावकारविराेधी कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या केवळ एक टक्का फायदा झाला आहे. जिल्हा उपनिबंधकांनी पाेलीस व सावकार यांच्याशी संगनमत करून सावकारग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यापेक्षा सावकारांची पाठराखण केली आहे. या सावकारीवर लाेकप्रतिनिधींचेही नियंत्रण नसल्याचा आराेपही त्यांनी केला. सन २००५पासून सावकारग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदाेलनाचा लेखाजाेखा मांडताना गावंडे यांनी महाराष्ट्र सावकारी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे हाेत नसल्याचे स्पष्ट केले. शहरातही सावकारी प्रचंड वाढली असून, तब्बल ४५ अवैध सावकार सध्या कार्यरत असून, तब्बल २०० काेटींची उलाढाल या प्रकरणात असल्याचा दावा त्यांनी केला. या सावकारांपैकीच एक अरुण शर्मा नावाचा एक सावकार आहे. या सावकाराला शिवसेनेचे नेते राजेश मिश्रा यांचेही पाठबठ असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे, असा दावा गावंडे यांनी केला. पत्रकार परिषदेला सावकारग्रस्त शेतकरी बहुउद्देशीय सेवा समितीचे प्रदेशाध्यक्ष रमेश खिरकर, बाळासाहेब भापट, जिल्हाध्यक्ष नरेंद्र शर्मा उपस्थित हाेते.
बाॅक्स
सत्तापक्षासह विराेधकांचाही सहभाग
अवैध सावकारीमध्ये राजकीय नेत्यांचे माेठ्या प्रमाणात पाठबळ असून, त्यामध्ये सत्ताधारी व विराेधी पक्षातील काही नेत्याचा सहभाग आहे. गावंडे यांनी पत्रकार परिषदेत सावकाराची माहिती घेण्यासाठी माेबाइल स्पीकरवर ठेवून तक्रारकर्त्यांचे म्हणणे जाहीरपणे ऐकवले. त्यामध्येही अरुण शर्मा सावकाराला राजेश मिश्रा यांचा पाठिंबा असल्याचे तक्रारकर्त्याने सांगितले. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणावर शिवसेना राष्ट्रवादीतच संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
बाक्स
२० हजारांसाठी ३४ ग्रॅम साेने गहाण
पत्रकार परिषदेत अन्वी मिर्झापूर येथील सावकारग्रस्त शेतकरी मनाेहर नारायण नवलकार यांनी आपबिती सांगितली. ते म्हणाले, २०१४मध्ये ३४ ग्रॅम साेने गहाण ठेवून २० हजार रुपये घेतले, त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा ४१ मण्यांची पाेथ गहाण ठेवून २० हजार रुपये घेतले. नापिकीमुळे साेने साेडविता आले नाही. याप्रकरणी १८ फेब्रुवारी २०२० राेजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. उपनिबंधकांनी ६ जुलै २०२० राेजी माझ्या तक्रारीत तथ्य असल्याचे पत्र दिले; मात्र अजूनही साेने मिळाले नाही.
माझा काहीही संबंध नाही : मिश्रा
सावकारीबाबत माझा काहीही संबंध नाही. मी काेणालाही पाठीशी घालत नाही. पाठराखण करत नाही. माझे नाव काेणी घेत असेल तर ते केवळ बदनामी करण्यासाठीच आहे हे षडयंत्र आहे - राजेश मिश्रा, शिवसेना नेते