पातूर : पाण्याच्या शोधार्थ शेतामध्ये आलेल्या बिबट्याने शेतात काम करणार्या शेतकर्यांवर हल्ला केला. यामध्ये दोघे जण जखमी झाले. ही घटना पातुर तालुक्यातील आगीखेड शिवारात रविवार, १0 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.आगीखेड येथील शेतकरी विठ्ठल शिरेकर (२९) व रामा चिंधाजी चिंचोळकर (३६) हे रविवारी त्यांच्या शेतात काम करीत होते. दुपारच्या सुमारास पाण्याच्या शोधार्थ एक मादी बिबट तीच्या दोन पिल्लांसह शेतात आली. शेतकर्यांची चाहुल लागताच बिथरलेल्या मादी बिबटाने अचानक शेतकर्यांवर हल्ला चढविला. यामध्ये विठ्ठल शिरेकर यांचे छातीवर तर रामा चिंचोळकर यांचे डोके व पायाला जखमा झाल्या. यावेळी भांबावलेल्या दोघांनी आरडाओरड केल्यामुळे मादी बिबट पिल्लांसह जंगलात पळून गेली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनपाल रामेश्वर पवार, वनरक्षक एम. डी. राठोड, रंजवे, योगेश सरकटे, वनमजुर विजय राठोड, गोपाल राऊत आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विठ्ठल शेरेकर व रामा चिंचोळकर यांच्यावर पातुर येथे प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचाराकरिता दोघांनाही अकोला येथे रवाना करण्यात आले.
बिबट्याचा शेतक-यांवर हल्ला
By admin | Published: April 11, 2016 1:32 AM