खेट्री : पातूर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत पिंपळखुटा शेतशिवारात दोन बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समोर येत आहे. पिंपळखुटा परिसरात लोखंडी विद्युत खांबाचा शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्याची घटना २४ डिसेंबर रोजीच्या सकाळी ११ वाजता उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विद्युत खांबाच्या बाजूला मुंगूसही मृतावस्थेत आढळून आल्याने मुंगसाची शिकार करण्यासाठी बिबटे शेतात घुसल्याचा अंदाज गावकऱ्यानी वर्तविला होता. परंतु त्यावेळी एक बिबटा फुगल्याच्या मृतावस्थेत आढळून आल्याने दोन्ही बिबट्यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे समोर येत आहे. गावातील लहान मुले जनावरांसाठी चारा आणण्यासाठी शेतात गेली असता, नितीन जगन्नाथ खरप यांच्या शेतातील विद्युत खांबाजवळ दोन बिबटे दिसून आल्याने लहान मुलांनी आरडाओरडा केल्याने शेजाऱ्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन त्या ठिकाणी धाव घेतली असता, दोन बिबट्यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले, या घटनेची माहिती मिळताच आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश नालिंदे, आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून, आता ग्रामस्थांना शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
चौकट
बिबट्यांच्या मृत्यूमध्ये पाच तासांचे अंतर
शॉक लागून दोन बिबट्यांचा मृत्यू झाल्या प्रकरणी एक बिबट्याचा मृतदेह फुगला होता. त्यामुळे दोन्ही बिबट्यांच्या मृत्यूमध्ये ४ ते ५ तासांचे अंतर असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.
प्रतिक्रिया
दोन बिबट्यांच्या मृत्यूमध्ये चार ते पाच तासांचे अंतर असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदर घटनेचा बारकाईने पंचनामा व चौकशी सुरू आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढची भूमिका घेण्यात येईल
- सतीश नालिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव
प्रतिक्रिया
विद्युत प्रवाह सुरू केला असता, त्या विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह येत नसल्याचे दिसून आले, तरीही शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल
पीए गुहे, कनिष्ठ अभियंता, वीज उपकेंद्र सस्ती
प्रतिक्रिया
सध्याही त्या विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह आहे. असे मी स्पष्ट करून दाखवतो. महावितरण विभागाने त्वरित विद्युत खांबांची दुरुस्ती करावी अन्यथा मोठी घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- कपिल खरप, शेतकरी पिंपळखुटा